
पंढरपूर – सध्या सुरु असलेल्या अधिक मासामुळे पंढरपूरमध्ये श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येथे दाखल होत आहेत. भक्तिभावाने ओथंबलेल्या या गर्दीत एकीकडे विठ्ठलनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद आणि पंढरीच्या ओढीने भरलेले वातावरण दिसत असले. तरी दुसरीकडे रात्रीच्या वेळी दर्शन रांगेतील वास्तव अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.
—————
सर्वात आश्चर्याचीबाब म्हणजे या संपूर्ण अडीच ते तीन किलोमीटर परिसरात मंदिर समितीच्या वतीने कुठेही पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षक होमगार्ड किंवा पोलिस प्रशासनाचे अधिकारी दिसून आले नाहीत.
—————–
चौकट : ( आषाढी, कार्तिकी प्रमाणे अधिकमासाचे नियोजन करावे) अनेक वारकऱ्यांनी एकमुखाने अशी मागणी केली की दर्शन रांग रात्री बंद न करता ती चोविस तास सुरु करणे. त्यांचा मुद्दा अतिशय साधा पण महत्त्वाचा आहेः वर्षातून भरणाऱ्या आषाढी व कार्तिकी यात्रांमध्ये ज्या प्रकारे अनेकदा १५ दिवस दर्शन २४ तास सुरु असते. त्याचप्रमाणे अधिक मासातही लाखो भाविकांची गर्दी असताना रांग रात्री साडेदहा ते सकाळी सहा बंद ठेवण्याचे कारण काय असा संतप्त सवाल देखील भाविकांमधून उपस्थित केला जात होता.
—————-
भाविकांच्या मते, जर दर्शन रांग अखंड सुरु राहिली. तर लोक योग्य वेळेत दर्शन घेऊन आपल्या निवाऱ्याच्या ठिकाणी परतू शकतील. त्यामुळे रांगेत तासन्तास अडकून राहण्याची वेळ येणार नाही. लहान मुले. वृद्ध महिला आणि बाहेरगावाहून आलेल्या भक्तांना याचा मोठा दिलासा मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भक्तीबरोबरच माणुसकी आणि व्यवस्थापन याचा समतोल राखला जाईल. ही मागणी केवळ सोयीसाठी नाही, तर ती गरजेची आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाविक येत असताना रात्रभर दर्शन रांग बंद ठेवणे, आणि मग तिथेच हजारो लोकांना अत्यंत असुविधाजनक परिस्थितीत अडकवून ठेवणे, हे योग्य नियोजनाचे लक्षण नाही.
—————–
भाविकांच्या श्रद्धेला शिस्त आणि व्यवस्थेला संवेदनशीलता जोडली गेली तरच पंढरपूरची परंपरा अधिक उज्ज्वल होईल. अन्यथा अशा प्रसंगांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक ठरेल. पंढरपूर हे केवळ एक मंदिर नाही, तर लाखो वारक-यांच्या भावनांचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच भाविकांच्या अपेक्षा, त्यांच्या सोयी आणि त्यांची सुरक्षितता याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
—————–
पदस्पर्श दर्शन रांगे मध्ये थांबलेल्या या वारकऱ्यांवर निसर्गानेही जणू दुसरा आघात केला. साधारण रात्री अकराच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली वर फक्त पांढऱ्या कापडाचे छप्पर होतेः परंतु त्या छपरातूनही पावसाचे थेंब अंगावर पडत होते. खाली पाणी साचून संपूर्ण परिसर चिखलमय आणि ओला झाला. अशा भिजलेल्या, दमट आणि अस्वस्थ करणाऱ्या वातावरणातच भाविकांनी जागेवर बसणे, आड़वे होणे किवा थोडी विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी ना पावसापासून पुरेशी आडोसा व्यवस्था, ना जमिनीवर बसण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित जागा, ना झोपण्यासाठी किमान सुविधा उपलब्ध होत्या. या दर्शन रांगेत डासांचा त्रास, पावसाचा मार, वाऱ्याचा झोत आणि दमट वातावरण यांचा सामना करावा लागला.
—————–
दर्शन रांगेत पिण्याचे पाणी, तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची उपलब्धता वैद्यकीय मदत, गर्दी नियंत्रणासाठी पुरेसे सुरक्षा कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर्शन रांगेचे २४ तास नियोजनबद्ध संचालन या बाबी आता केवळ सूचना न राहता तातडीच्या गरजा बनल्या आहेत. अधिक मासातील हा अनुभव प्रशासनासाठी एक इशारा आहे. श्रद्धेच्या या प्रचंड लाटेला योग्य व्यवस्थापनाची किनार न दिल्यास भाविकांच्या मनात असंतोष निर्माण होतो. पण जर वेळेवर आणि संवेदनशील निर्णय घेतला गेला, तर पंढरपूरचे दर्शन अधिक सुलभ, शिस्तबद्ध आणि भाविकांसाठी संस्मरणीय ठरु शकते. वारकऱ्यांची एकच अपेक्षा आहे. विठ्ठलाच्या दर्शनाचा मार्ग सुविधांनी समृद्ध असावा, आणि दर्शनासाठी उभा राहणारा प्रत्येक भक्त सन्मानाने, सुरक्षितपणे आणि सुलभतेने दर्शन घेऊन परत आपल्या गावी जावा.























