सोलापूर – गोकुळ साखर कारखान्याकडून गेल्या दोन गळीत हंगामांतील ऊस बिलाची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याने धोत्री परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. थकीत बिल तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी शेतकऱ्यांनी साखर उपआयुक्त विजय गावडे यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे शेतीचे होत असलेले नुकसानही शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या याभेटीत जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण काशिनाथ बिराजदार, जिल्हा सरचिटणीस रमेश अण्णा भंगे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. निवेदनात नमूद करण्यात आले की, गोकुळ साखर कारखान्याकडे सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या गळीत हंगामातील ऊस उत्पादकांची मोठी रक्कम थकीत आहे.
काही शेतकऱ्यांची तब्बल १ लाख २९ हजार रुपयांची देयके अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला.
ऊस बिल वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून शेतीसाठी बियाणे, खत, औषधे खरेदी करणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर मुलांचे शिक्षण, घरगुती जबाबदाऱ्या आणि विवाह खर्च भागविताना मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. “ऊस दिल्यानंतरही महिनोनमहिने पैसे मिळत नसतील, तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे?” असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
दरम्यान, कारखान्याकडून प्रक्रिया न केलेले दूषित पाणी परिसरातील शेतजमिनीत सोडले जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. यामुळे पिकांचे नुकसान होत असून जमिनीची सुपीकता घटत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी आणि प्रदूषण रोखण्यासाठी कारखान्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
साखर उपआयुक्त विजय गावडे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत संबंधित प्रकरणाची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
चौकट
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या प्रलंबित देयके मिळविण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या केला. यावेळी शेतकऱ्यांनी चूल मांडून चहापान केल्याचे चित्र दिसून आले.




















