सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याकडून तब्बल १३० कोटी रुपयांचे ऊस बिल थकवण्यात आल्याचा आरोप करत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. थकीत रक्कम तातडीने मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. धरणे आंदोलनाचा हा दुसरा दिवस असून आंदोलनस्थळीच चूल पेटवून डाळ-भात शिजवत आंदोलन अधिक तीव्र केले आहे. तर दुपारी जिल्हा परिषदेच्या प्रमुख रस्त्यावर आंदोलकांनी धरणे देत रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, जोपर्यंत आमच्या खात्यावर ऊस बिलाची रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी आंदोलनस्थळीच मुक्काम ठोकून आहेत. आंदोलना रस्त्याच्या कडेला चूल मांडून सामूहिक स्वयंपाक केला जात असून, त्यातून शेतकऱ्यांचा संताप आणि आर्थिक अडचणी स्पष्ट दिसून येत आहेत. आंदोलनाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश काढल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, केवळ आदेश नव्हे तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे महत्त्वाचे असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. आंदोलक शेतकरी अमोल पाटील यांनी सांगितले की, “कारखान्याने अनेक महिन्यांपासून ऊस बिल थकवले आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. मुलांचे शिक्षण, शेतीचा खर्च आणि घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता आरपारची लढाई सुरू केली आहे. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले असून प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी अरविंद घोडके, अंबादास शिवशंकर, सचिन जवळगे, प्रशांत सुरवसे, गणेश नरे यांच्यासह सुमारे तीस गावांतील शेतकरी सहभागी झाले आहेत.
चौकट
आंदोलनस्थळीच सुरू ‘डाळ-भात आंदोलन’
थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता आंदोलनाला वेगळे स्वरूप दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल पेटवून डाळ-भात शिजवत शेतकरी दिवस काढत आहेत. “पैसे मिळेपर्यंत इथून हलणार नाही,” असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
चौकट
मंडप उभारण्यास परवानगी नाकारल्याने आंदोलनकर्ते शेतकरी संतप्त
थकित ऊस देयक मिळविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलनस्थळी मंडप उभारण्यास परवानगी नाकारल्याने आंदोलनकर्ते शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर ठिय्या मारून रास्तारोको करत आंदोलन सुरू केले.
Post Views: 15