पिलीव – संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या (९६५ G) कामात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्ष काम पूर्ण न करताच कागदोपत्री काम झाल्याचे दाखवून कोट्यवधी रुपयांची बोगस बिले काढल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. याबाबत संघटनेच्या वतीने प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या आषाढी वारीची लगबग सुरू असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या महामार्गाचे काम निकृष्ट आणि अपूर्ण असतानाही ठेकेदाराने अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून पैसे उचलले आहेत.
तरंगवाडी (वेताळबाबा मंदिर): येथे ७०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्याचे दाखवून पैसे लाटले आहेत, मात्र प्रत्यक्ष काम झालेले नाही. या रस्त्यामुळे अनेक अपघातांत नागरिकांना जीव गमवावा लागला असून, शालेय विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
शेळगाव ब्रिज येथील पुलाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचे दाखवून त्याचे पूर्ण पेमेंट उचलण्यात आले आहे.
इंदापूर (पुणे-सोलापूर हायवे) बारामती चौक येथील १६०० मीटर रस्त्याचे काम न करताच ठेकेदाराने पैसे काढले आहेत.
अशा अनेक ठिकाणी सुमारे ४० ते ५० कोटी रुपयांचे काम कागदोपत्री दाखवून सरकारी तिजोरीवर डल्ला मारल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
या भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांवर दोन दिवसांच्या आत प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कडक कारवाई करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संबंधित कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते मगन काळे, तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
”जर दोन दिवसांत या प्रकरणाची दखल घेऊन न्याय मिळाला नाही, तर दोषी अधिकाऱ्यांना काळे फासले जाईल आणि यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.”
– अजित बोरकर, तालुका अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
Post Views: 17