सोलापूर – जिल्हा परिषद प्रशासनासमोर मनुष्यबळाचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची चिन्हे दिसत असून ३१ मे रोजी तब्बल ३३७ कर्मचारी वयोनियमानुसार सेवानिवृत्त होणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून ग्रामीण शिक्षण व्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेमधील विविध विभागांमध्ये आधीच रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असताना मोठ्या प्रमाणात होणाऱ्या सेवानिवृत्तीमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढणार आहे. शासनाकडून नवीन भरती प्रक्रिया अपेक्षित वेगाने राबवली जात नसल्याने विभागप्रमुखांना मर्यादित मनुष्यबळावरच कामकाजाची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.
सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये प्राथमिक शिक्षण विभागातील २४६ शिक्षक व कर्मचारी आघाडीवर आहेत. त्याखालोखाल सामान्य प्रशासन विभागातील १९, आरोग्य विभागातील १८, ग्रामपंचायत विभागातील १५, बांधकाम विभाग क्रमांक १ मधील १३ आणि बांधकाम विभाग क्रमांक २ मधील १२ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. याशिवाय कृषी विभागातील ५, पशुसंवर्धन विभागातील ५, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागातील २ आणि महिला बालकल्याण विभागातील २ कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे.
ग्रामीण भागातील शाळा, आरोग्य सेवा, ग्रामपंचायत प्रशासन आणि विकासकामांवर या सेवानिवृत्तीचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, रिक्त पदे तत्काळ भरणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अनुभव प्रशासनासाठी उपयोगात आणणे आणि डिजिटल कामकाजाला गती देणे आवश्यक असल्याचे मत प्रशासनातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. अन्यथा ग्रामीण प्रशासनावर वाढत्या कामाच्या ताणाचा परिणाम सेवा वितरणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Post Views: 10