बार्शी – उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या करमाळ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीत गुटखा साठ्यावर धाडीची कारवाई झाल्यानंतर काल दि. २७ मे रोजी सायंकाळी सहा वाजता शहरातील तेल गिरणी चौकातील रमाकांत पिसे यांच्या सायकल दुकानाजवळच्या आडोशाला बसून मुंबई कल्याण नावाचा मटका जुगार खेळत असताना माजी नगराध्यक्ष श्रीकांत पिसे यांचा मुलगा अजिंक्य श्रीकांत पिसे, माजी नगरसेवक सोमनाथ पिसे यांचा मुलगा गणेश पिसे, यांच्यासह सहाजणांना रोख रक्कम व मोबाईलसह निर्भया पथकाने पकडले आहे.
या कारवाईत पिसे बंधुंसह सुदेश पांडुरंग कोळपे वय ३६ सुभाष नगर, विजय दत्ता गवळी वय २८ खुरपे बोळ, अमोल भास्कर पवार वय ४२ राऊत चाळ, दिनकर अर्जुन कांबळे वय ४४ राहणार तांदुळवाडी रोड, कळंब यांच्याबरोबर एकूण सहाजणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत २२ हजार रुपये रोख व एकूण पाच मोबाईलचे हँडसेट व जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
या कारवाईत निर्भया पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब घाडगे, हनुमंत पाडूळे, नम्रता गटकुल, चालक पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब महानोर यांनी भाग घेतला.
पिसे बंधूंना मटका जुगाराचा मोठा इतिहास असून त्यांच्यावर आजपर्यंत अनेकवेळा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मात्र त्यांची संघटित गुन्हेगारी वर्षानुवर्षे सुरुच आहे. त्यामुळे त्यांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांच्यावर मोका कायदा लावण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या कारवाईच्या मालिकेमुळे बार्शीकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.
Post Views: 11