सोलापूर – ग्रामीण भागातील मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींसाठी आधार ठरणाऱ्या शेळगी येथील सावित्रीबाई शासकीय वसतिगृहाच्या कारभाराबाबत विद्यार्थिनींनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वसतिगृह कायमस्वरूपी सुरू ठेवून प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच राबविण्याची मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विविध पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा वेगवेगळ्या कालावधीत संपत असल्याने अनेक विद्यार्थिनींना वेळेत प्रवेश मिळत नाही. काही वेळा वसतिगृह ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात सुरू होत असल्याने ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होते.
विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थिनींना बाहेर खासगी राहण्याचा खर्च परवडत नसल्याने त्यांच्या शिक्षणावर थेट परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सुरक्षित व परवडणारे निवासस्थान उपलब्ध व्हावे, हा वसतिगृहाचा मूळ उद्देश असताना प्रशासनाच्या विलंबामुळे विद्यार्थिनींना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. विद्यार्थिनींच्या शैक्षणिक हिताचा विचार करून वसतिगृह वर्षभर सुरू ठेवावे, प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी तसेच विद्यार्थिनींच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरांमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या ग्रामीण मुलींसाठी शासकीय वसतिगृहे ही केवळ निवासाची व्यवस्था नसून शिक्षण टिकवून ठेवण्याची जीवनरेषा ठरत आहेत. मात्र प्रवेश प्रक्रियेतील विलंब आणि अनिश्चितता यामुळे अनेक विद्यार्थिनी शिक्षण अर्धवट सोडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचत असल्याचे वास्तव या निवेदनातून पुन्हा समोर आले आहे.
ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींच्या भविष्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून त्यातून अनेक गरजू विद्यार्थ्यांचा मोठा आधार मिळणार असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. यावेळी विजयालक्ष्मी भरमशेट्टी, रुचिता जिरगे, मयुरी जिरगे, पूजा पाटील, संस्कृती घोटाळे, स्मिता काळे, सौंदर्य चराटे, करुणा हेगडे आदिसंह विद्यार्थिनींची उपस्थिती होती.
Post Views: 16