बार्शी – येथे वास्तव्यास असलेल्या विवाहित सुरय्या अमीर पठाण (वय ३५) यांनी पती अमीर उमराव पठाण, सासू राशीद उमराव पठाण, नणंद शमा अमीर इनामदार, नणंद नजमा बशीर सय्यद आणि आसमा ताहीर काझी यांच्याविरुद्ध शारीरिक व मानसिक छळ, मारहाण, शिवीगाळ आणि धमकावल्या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, सुरय्या पठाण यांचा विवाह दि. २४ फेब्रुवारी २०१३ रोजी अमीर उमराव पठाण यांच्यासोबत मुस्लिम रितीरिवाजानुसार बार्शी येथे झाला होता. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत सुरु होता. मात्र सप्टेंबर २०१३ पासून पती अमीर पठाण, सासू राशीद पठाण आणि नणंद शमा इनामदार यांनी परमिट रुम व्यवसाय सुरु करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.
माहेरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे सांगूनही पैशांची मागणी कायम ठेवण्यात आली. पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर शिवीगाळ, मारहाण, उपाशी ठेवणे तसेच सतत मानसिक त्रास देण्यात येत असल्याचे सुरय्या पठाण यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. यामध्ये नणंद नजमा बशीर सय्यद हिनेही वेळोवेळी छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, सन २०२५ पासून पती अमीर पठाण यांचे आसमा ताहीर काझी या महिलेशी कथित अनैतिक संबंध असल्याचा संशय सुरय्या पठाण यांना आला. याबाबत जाब विचारल्यानंतर पतीकडून शिवीगाळ व धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आसमा काझी हिची भेट घेऊन संबंध तोडण्याची विनंती केली असता, तिनेही शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, दि. २१ मे २०२६ रोजी तारापूर येथे गेल्यानंतर अमीर पठाण यांनी पत्नी व मुलांना मारहाण केली. त्याचवेळी सासू राशीद पठाण तसेच नणंद शमा इनामदार व नजमा सय्यद यांनी अमीर पठाण यांचे आसमा काझी हिच्यासोबत लग्न लावून देणार असल्याचे सांगून तक्रारदार महिलेला व तिच्या तीन मुलांना घराबाहेर काढण्याची धमकी दिली. तसेच भीमा नदीत ढकलून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सुरय्या पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीत सप्टेंबर २०१३ ते मे २०२६ या कालावधीत पती अमीर उमराव पठाण, सासू राशीद उमराव पठाण, नणंद शमा अमीर इनामदार, नणंद नजमा बशीर सय्यद आणि आसमा ताहीर काझी यांनी संगनमताने शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Post Views: 7