बार्शी – गेल्या काही महिन्यांपासून वावर असलेल्या बिबट्याचा मुक्काम बार्शी तालुक्यातच कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. खांडवी गावच्या हद्दीत बिबट्याच्या दर्शनामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागासमोर यानिमित्ताने आणखी एकदा आव्हान उभा ठाकले आहे.
दोन वेळा तालुक्यात बिबट्याचे दर्शन झाले असून बार्शी-टेंभुर्णी रस्त्यावरील खांडवीच्या हद्दीत एका धावत्या पिकअप वाहनासमोर अचानक बिबट्या आल्याची घटना घडली. अचानक समोर आलेल्या या बिबट्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांची चांगलीच गाळण उडाली. या घटनेमुळे खांडवी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रात्री दूध वाहतूक करणारे ‘महिंद्रा पिकअप’ वाहन (एम. एच. ४५ – ६३३४) बार्शीकडून
टेंभुर्णीच्या दिशेने निघाले होते. या वाहनामध्ये संतोष उत्तम वाघमारे (रा. टेंभुर्णी) आणि चालक पोपट साहेबराव जगताप (वय ४४, रा. कालठण नंबर २, ता. इंदापूर) हे दोघेजण होते. हे वाहन खांडवीच्या हद्दीतील यशवंत विद्यालय आणि हॉटेल लकीजवळ आले असता, उपळाईच्या दिशेने रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक बिबट्या रस्ता ओलांडत आल्याचे दिसले. पिकअप गाडी अवघ्या १० ते १५ फुटांच्या अंतरावर असताना बिबट्या रस्ता ओलांडून जाताना दिसला. यानंतर बिबट्याने रस्त्याशेजारील झुडपांचा आसरा घेतला, असे वाघमारे यांनी सांगितले.
रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावरच बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये आणि विशेषतः खांडवी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे वन विभागाने तातडीने या भागात गस्त घालावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे. विशेष म्हणजे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बिबट्याच्या या चर्चेने शेतकरी चिंतेत आहेत. यासाठी वन विभागाने याबाबत तत्काळ उपाययोजना करावी, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Post Views: 16