बार्शी – कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी ज्ञाननिष्ठा, समाजनिष्ठा आणि विद्यार्थीनिष्ठा आयुष्यभर जोपासली असून, त्यांनी उपेक्षितांचे अंतरंग जाणून घेऊन त्यांच्या विकासासाठी अवघे आयुष्य वेचले,असे प्रतिपादन माजी प्राचार्या कमलताई ठकार (लातूर) यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या ४५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राचार्या ठकार बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्र राऊत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, सचिव प्रकाश पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, माजी प्राचार्य चंद्रकांत मोरे, सदस्य विष्णू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे ठकार म्हणाल्या की, कर्मवीर मामांनी साधेपणा आणि आपली त्यागी वृत्ती जीवनभर जोपासली. आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे. मुलींनी शिकावे आणि पुढे जावे असा विचार मामांचा होता. ज्ञानाचा डोक्याला आधार असावा, पण डोक्याला ओझे असू नये. आज समाजात बाह्य स्वरुपाला जास्त महत्त्व येत चालले आहे. त्याऐवजी सत्याचा आधार घेऊन अंतरंग विकसित केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना माजी आमदार राऊत म्हणाले की, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील गोरगरीबांच्या मुलांचे शिक्षण देण्याचे अनमोल असे काम केले आहे. कर्मवीर मामांनी तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीतून शैक्षणिक संस्था उभा केली. तसेच आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामगिरीने अनेकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते, असेही त्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्रकाश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किरण गाढवे यांनी केले तर, आभार सहसचिव अरुण देबडवार यांनी मानले.
Post Views: 12