सांगोला – येथील ग्रामदैवत श्री अंबिका देवी मंदिरात अधिक मास पौर्णिमेचे औचित्य साधून देवीला आंब्यांची आकर्षक आरास बांधण्यात आली होती. दरवर्षी विविध सण आणि उत्सवांना श्री अंबिका देवीला वेगवेगळ्या प्रकारची आरास केली जाते. यावर्षी अधिक मासाचे विशेष महत्त्व साधून ही आम्रआरास देवीचे पुजारी सोमनाथ गुरव व मयुरेश गुरव यांनी केली.
अधिक मास पौर्णिमेनिमित्त सांगोला शहरातील ग्रामदैवत श्री अंबिका देवीच्या मूर्तीला आकर्षक वस्त्र आणि सुवर्ण अलंकारांनी सजवले होते. संपूर्ण गाभारा आणि देवीच्या मूर्तीभोवती रसाळ हापूस आंब्यांची सुंदर रचना करण्यात आली होती. आंब्यांच्या या मनमोहक मांडणीमुळे संपूर्ण मंदिर परिसर सुवासाने दरवळून गेला होता. ही नयनरम्य पूजा दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना प्रसन्न करून गेली. अधिक मास पौर्णिमेच्या निमित्ताने ग्रामदैवतेच्या दर्शनासाठी आणि हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.