
वैराग – एकता महिला मंचच्या माध्यमातून मानेगाव (ता. बार्शी) येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य जयंती महोत्सव, महिला मार्गदर्शन मेळावा, विविध स्पर्धा तसेच समर्थ डेंटल क्लिनिक (वैराग) यांच्या वतीने भव्य दंत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानेगाव येथे हा सोहळा अत्यंत थाटामाटात, जल्लोषात आणि आनंदमय वातावरणात पार पडला.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व सत्कार
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवर आणि एकता महिला मंचच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मंचच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.
या सोहळ्यासाठी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापसिंह जाधव, समर्थ डेंटल क्लिनिकचे प्रमुख डॉ. शितल बोराडे, एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर, डॉ. गझल चौधरी, सुवर्णा आलाट, तसेच मंचच्या प्रमुख पदाधिकारी लक्ष्मी सुतार, आशा विभूते, रोहिणी डाके, रंजना गवळी, राणी गवळी, राजश्री बादगुडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
१०० महिला व मुलींची मोफत दंत तपासणी
कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक बांधिलकी जपत समर्थ डेंटल क्लिनिक (वैराग) यांच्या वतीने आयोजित मोफत दंत आरोग्य शिबिराने झाली. या शिबिरामध्ये गावातील एकूण १०० महिला व मुलींची मोफत दंत तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, तपासणी केलेल्या सर्व महिला व मुलींना क्लिनिकच्या वतीने मोफत टूथपेस्टचे वाटप करण्यात आले.
खेळांच्या स्पर्धा आणि बक्षीस वितरण
महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि महापुरुषांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी मोठा उत्साहाने भाग घेतला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:
संगीत खुर्ची स्पर्धा: प्रथम- राणी गवळी, द्वितीय- अश्विनी डाके, तृतीय- मंगल डाके, उत्तेजनार्थ- रजनी घोंगडे.
बिस्किट खाणे स्पर्धा: प्रथम- सुनिता जांभळे, द्वितीय- राजश्री बादगुडे.
उखाणे स्पर्धा: प्रथम- आरती ताटे, द्वितीय- अश्विनी डाके, तृतीय- राजश्री बादगुडे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन: महिला सक्षमीकरणावर भर
कार्यक्रमादरम्यान रोहिणी डाके, रंजना गवळी आणि आशा विभूते यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना एकता महिला मंचच्या व्यासपीठाविषयी सविस्तर माहिती दिली.
समर्थ डेंटल क्लिनिकचे प्रमुख डॉ. शितल बोराडे यांनी दंत आरोग्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “आपल्या दैनंदिन जीवनात इतर आजारांप्रमाणेच दातांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.” तसेच, एकता महिला मंचचे कार्य स्तुत्य असून आजची महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, हे मानेगावच्या महिलांनी या भव्य आयोजनातून दाखवून दिले आहे, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.
मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आम्ही राबवत असलेले सामाजिक उपक्रम ग्रामीण भागातील शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचणे आणि त्यातून जनजागृती निर्माण होणे ही काळाची गरज आहे. महिलांना प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांची जयंती साजरी करणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आगामी काळातही आम्ही अशाच प्रकारे ग्रामीण भागात सामाजिक हिताचे कार्यक्रम राबवत राहू.”
महिलांची विक्रमी उपस्थिती
या कार्यक्रमासाठी मानेगाव येथील एकता महिला मंचच्या प्रमुख रेणुका चौगुले, अश्विनी डाके, सुनिता जांभळे, संगीता डाके, रजनी घोंगडे, मेघा दिंडोरे, मनीषा कापसे, आविदा डाके, लोचना डाके, सविता डाके, सुरेखा डाके, अनिता डाके, मंगल डाके, इंदुमती मोरे, लक्ष्मी मोरे, रसिका डाके, संस्कृती डाके, वैष्णवी डाके, दुर्वा डाके, सृष्टी माळी यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजनी घोंगडे यांनी केले. अत्यंत उत्कृष्ट आणि कार्यक्रमात रंग भरणारे सूत्रसंचालन रोहिणी डाके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुनिता जांभळे यांनी मानले.
Post Views: 4