
सोलापूर – हत्तुरे नगर येथील श्री मल्लिकार्जुन हायस्कूलचे ज्येष्ठ क्रीडाशिक्षक गंगाराम महादेव घोडके हे आपल्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान २७ वर्षांच्या सेवेनंतर, शासनाच्या नियत वयोमानानुसार ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या यशस्वी सेवापूर्तीनिमित्त सोमवार, १ जून रोजी सकाळी ११ वाजता एका भव्य सेवानिवृत्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे.
होटगी रोडवरील आसरा चौकातील किल्लेदार मंगल कार्यालय येथे हा सोहळा श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य वैजिनाथ हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी मजरेवाडी शिक्षण संकुल मार्गदर्शक धरेप्पा हत्तुरे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष महेश इंगळे, म.न.पा. जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सिध्देश्वर पाटील, सोलापूर शहर व जिल्हा बेसबॉल असोसिएशन अध्यक्ष, नगरसेवक व सी.ए. विनोद भोसले,
महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन सचिवमा. डॉ. प्रदिप तळवेलकर (गुरुजी), श्री मल्लिकार्जुन हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक रमेश दिंडोरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सन्मान सोहळ्यास सर्व क्रीडाप्रेमी, आजी-माजी विद्यार्थी आणि स्नेहीजनांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघ प्रा. जिल्हाध्यक्ष संतोष खेडे व शहराध्यक्ष सुहास छंचुरे यांनी केले आहे.



















