
सोलापूर – कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करण्यासाठी वेळेवर निदान आणि उपचार अत्यंत महत्त्वाचे ठरतात. याच उद्देशाने माळशिरस तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकरनगर येथे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅन्सर व्हॅन शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण ११७ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून काही संशयित रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले आहे.
या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. महेश माने यांनी महिलांची तपासणी केली, तर दंतरोग तज्ज्ञ डॉ. किरण पोटे यांनी दंत तपासणीसह तोंडाच्या कॅन्सरबाबत मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल आव्हाड यांच्या उपस्थितीत समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान दिले.
तोंडाच्या कॅन्सरसाठी ११७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन संशयित रुग्ण आढळून आले असून त्यांना पुढील तपासणी आणि उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले आहे. स्तन कॅन्सरसाठी ८६ महिलांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे या तपासणीत एकाही महिलेमध्ये कॅन्सरची संशयास्पद लक्षणे आढळली नाहीत. मात्र गर्भाशयमुख (पिशवीच्या मुखाचा) कॅन्सर तपासणीत ८ महिलांमध्ये संशयास्पद लक्षणे आढळून आली असून त्यापैकी २ महिलांना पुढील निदानासाठी संदर्भित करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना घराजवळच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच कॅन्सरविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तंबाखू, गुटखा आणि इतर व्यसनांपासून दूर राहून तोंडाचा कॅन्सर टाळता येऊ शकतो. तसेच महिलांनी स्तन आणि गर्भाशयमुख कॅन्सरच्या नियमित तपासण्या करून घ्याव्यात, कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे अशा आरोग्य शिबिरांमधून नागरिकांनी नियमित सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Post Views: 19