
सोलापूर – आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि सामाजिक कल्याणाच्या विविध उपक्रमांना गती देण्याचा निर्धार देऊ त्याचप्रमाणे समाजकल्याण दिव्यांग कल्याण यांसह जात प्रमाण वैधता याबाबतचे प्रलंबित प्रश्न एका शिबिराच्या माध्यमातून सोडविणार असल्याचा आशावाद सभापती संस्कृती सातपुते यांनी व्यक्त केला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सभापती संस्कृती सातपुते यांनी माहिती दिली
दरम्यान, आषाढी वारी मार्गावरील सुविधा आणि व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी २७ जून रोजी माळशिरस ते धर्मपुरी या मार्गाची संयुक्त पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, निवारा व्यवस्था आणि वारकरी सेवेशी संबंधित कामांची तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष्यमान कार्ड नोंदणी मोहिमेला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आरोग्य संरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यावर भर देण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात आदर्श शाळा उभारणीची संकल्पना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच गावपातळीवर समाजमंदिरांची निर्मिती करण्यास प्राधान्य देण्याबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील शाळांमध्ये “गुड टच- बॅड टच” विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छता आणि महिला आरोग्याच्या दृष्टीने हिरकणी सॅनिटरी प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आरोग्यदूतांची विशेष बैठक २७ जून रोजी पंढरपूर येथे आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये वारीकालीन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हाभरात अडीच लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. विविध शासकीय विभाग, ग्रामपंचायती आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय अकलूज येथील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी जागेची अडचण दूर करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. दिव्यांग कल्याण विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठीही आवश्यक उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला.
एकूणच, वारी व्यवस्थापनाबरोबरच आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ठोस उपक्रम राबवून ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचा निर्धार या बैठकीतून स्पष्टपणे दिसून आला.
कोट
दिव्यांग कल्याण, जात प्रमाणपत्र तसेच समाजकल्याण विभागासमोरील विविध प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी सोडविण्यावर आमचा विशेष भर आहे. विभागाचे काम अधिक प्रभावीपणे आणि गतीने होण्यासाठी पूर्णवेळ समाजकल्याण अधिकारी उपलब्ध व्हावा यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तसेच अकलूज येथील वसतिगृहासाठी जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांची लवकरच भेट घेऊन संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार आहे. समाजातील वंचित, दिव्यांग आणि गरजू घटकांना योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.
संस्कृती सातपुते, सभापती, समाजकल्याण समिती, जिल्हा परिषद सोलापूर.
Post Views: 23