सोलापूर : बदलते हवामान, वाढते प्रदूषण आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विजापूर रोड येथील द्वारकाधीश मंदिरात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. युवराज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व कॅन्सर रिसर्च सेंटर, ड्रीम फाऊंडेशन, लेवा पाटीदार बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, बसव संगम शेतकरी गट आणि विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बदलते हवामान व आरोग्यावर होणारे परिणाम’ या विषयावर व्याख्यान तसेच ‘कॅन्सरमुक्त भारत – कॅन्सरमुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत सेंद्रिय शेती उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आत्मा प्रकल्प संचालक कांतपा खोत, राजशेखर पाटील, संगीता जाधव, शिवाजी वाघमोडे, वनिता पाटील आणि पोलिस निरीक्षक दिलीप ताडकासे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना देवकर यांनी सोलापूर शहरात एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.आत्मा प्रकल्प संचालक कांतपा खोत यांनी कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून बचावासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात डॉ. संतोष राठोड, सुनील वाघमारे, बाळासाहेब पाटील आणि संयोजक काशिनाथ भतगुणकी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नंदकुमार टिंगरे, नागेश म्हेत्रे, अजित चव्हाण, शिरीष गोळवलकर, स्मिता देशपांडे, जितेंद्र वाघमारे आणि अनु क्षीरसागर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युसुफ पीरजादे यांनी केले, तर दत्तात्रय पाठक यांनी आभार मानले.
—-
Post Views: 15