सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्याची स्थापना केली नाही, तर कृषी, सामाजिक, आर्थिक, लष्करी, सांस्कृतिक आणि प्रशासकीय क्षेत्रांत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणत भारतीय इतिहासात ‘अष्टक्रांती’ घडविली. शिवरायांच्या या क्रांतिकारी कार्याचा विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवरायांची ‘अष्टक्रांती’ राष्ट्रनिर्मितीचा आदर्श मार्ग आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा शिवचरित्र व्याख्याते पांडुरंग बलकवडे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बलकवडे हे बोलत होते. विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, हिंदकेसरी पैलवान महेंद्र गायकवाड, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या पद्मजादेवी मोहिते पाटील, प्रा. देवानंद चिलवंत, समन्वयक डॉ. अनिल घनवट यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यासन केंद्राचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. डॉ. राजेंद्र गायकवाड यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. हिंदकेसरी पैलवान महेंद्र गायकवाड याचा विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
बलकवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा ऐतिहासिक संदर्भांसह उहापोह केला. त्यांनी सांगितले की, शिवरायांनी अन्याय, अत्याचार आणि परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष करत स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. लोककल्याणाला केंद्रस्थानी ठेवत त्यांनी पारदर्शक आणि जबाबदार शासनव्यवस्था निर्माण केली. स्त्री सन्मानाचे संरक्षण, शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण, सशक्त आरमाराची उभारणी, किल्ल्यांचे जाळे, सक्षम गुप्तचर व्यवस्था, धार्मिक सहिष्णुता आणि न्यायनिष्ठ कारभार या माध्यमातून त्यांनी आधुनिक राष्ट्रकारभाराचे आदर्श निर्माण केले. त्यांच्या चरित्रातून राम आणि कृष्णाचा संगम दिसून येतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘छत्रपती शिवरायांची अष्टक्रांती’ या विषयावर बोलताना त्यांनी शिवरायांच्या कार्यामुळे भारतीय समाजात निर्माण झालेल्या आत्मविश्वासाची जाणीव करून दिली.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. छत्रपती शिवरायांची ‘अष्टक्रांती’मधून विद्यापीठाला भरपूर काही घेण्यासारखे आहे. विद्यापीठाच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन एकसंघ राहून काम करू, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल घनवट यांनी केले. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित या विशेष व्याख्यानाला विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Post Views: 10