सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे निर्मिती विहार परिसरातील मनपाच्या ओपन स्पेसमधील तब्बल २५ कडुलिंब वृक्षांची होणारी कत्तल टळली आहे.
निर्मिती विहार परिसरातील काही जागरूक नागरिकांना मनपाच्या मालकीच्या खुल्या जागेत संशयास्पद वृक्षतोड सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याबाबत उपमहापौर देवकर यांना माहिती दिली. माहिती मिळताच उपमहापौरांनी महानगरपालिका उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्वरित घटनास्थळी पाठविले.पथक घटनास्थळी पोहोचले असता एक वृक्ष आधीच तोडण्यात आलेला होता, तर आणखी २५ वृक्ष तोडण्याची तयारी सुरू असल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान वृक्षतोडीसाठी वापरण्यात येणारे कोयते, झाडे तोडण्याची मशीन, पेट्रोल, रासायनिक पदार्थ (ॲसिड) तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
या गंभीर प्रकाराची दखल घेत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी संबंधित व्यक्तींवर दंडात्मक व कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच शहरातील सार्वजनिक जागांवरील वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून अशा प्रकारांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
“वृक्ष हे शहराचे फुफ्फुस आहेत” : उपमहापौर देवकर
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर म्हणाल्या, वृक्ष हे शहराचे फुफ्फुस आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल.
Post Views: 38