सोलापूर – सोलापूर जिल्हा टेबल टेनिस संघटना व बार्शी टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चॅम्पियन मेगा टेबल टेनिस लीग’ स्पर्धेत ऋषिकेश नलावडे यांच्या नेतृत्वाखालील ‘डोमीनाटर्स’ संघाने अजिंक्यपद पटकावले.
इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवरील मुळे पॅव्हेलियन येथे झालेल्या या थरारक स्पर्धेत डोमीनाटर्स संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदाला गवसणी घातली. विजेत्या संघात ऋषिकेश नलावडे सोबत स्वप्निल फडके, राजेश भिलावे, नमन अगरवाल आणि चैत्रा लोकोजू या खेळाडूंचा समावेश होता.
या स्पर्धेत ‘दबंग’ संघाने उपविजेतेपद संपादले. या संघात पिनाक पाटकर, ओंकार मुळे, सचिन चव्हाण, अद्वैत जोशी आणि ईश्वरी पाटील यांनी चमकदार कामगिरी केली. तर, डॉ. नितीन तोष्णीवाल, राजवर्धन तिवारी, मुक्ता शेवाडे, अथर्व खळदकर आणि शिवानी सानप यांच्या ‘स्पिन वॉरियर्स’ संघाने तिसरा क्रमांक मिळविला.
बँक ऑफ बडोदाचे सिनियर मॅनेजर देवेश कुमार, ग्रामीण महाराष्ट्र बँकेचे श्री. सावंत, श्री. भोसले आणि सुनील मदान यांच्या हस्ते विजेत्यांना करंडक व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या भव्य स्पर्धेला ग्रामीण महाराष्ट्र बँक, डॉ. भास्कर पाटील, डॉ. नितीन तोष्णीवाल आणि पोतदार लॅब यांचे प्रायोजकत्व लाभले होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गणेश स्वामी, झेड. एम. पुणेकर, गोवर्धन अहमद शेख, श्री खळदकर आणि ओंकार काबरा यांनी परिश्रम घेतले.
——-





















