सोलापूर : महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोमवारी न्यू बुधवार पेठ परिसरातील कस्तुरबा उद्यान आणि कस्तुरबा भाजी मार्केटची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्यांची दखल घेत आयुक्तांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
या पाहणी दौऱ्यात नगरसेविका वंदना गायकवाड, अजित गायकवाड, नगर अभियंता प्रमुख सारिका आकुलवार, विभागीय अधिकारी सुनीता हिबारे, उद्यान प्रमुख कोमल काशीद, आरोग्य निरीक्षक खाजाप्पा कट्टीमनी, सामाजिक कार्यकर्ते जोशी बुवा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कस्तुरबा उद्यान सध्या बंद अवस्थेत असल्यामुळे तेथे समाजकंटकांचा वावर वाढल्याची बाब नगरसेविका वंदना गायकवाड यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर उद्यानातील वाढलेली झुडपे, अनावश्यक झाडे आणि साचलेला कचरा तातडीने हटवून परिसर स्वच्छ करण्याचे आदेश उद्यान विभागाला देण्यात आले. तसेच उद्यानामध्ये वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम आणि चिल्ड्रेन पार्क विकसित करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने कामे हाती घेण्यात येतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. नगरसेवकांनी त्यांच्या निधीतून सहकार्य केल्यास ही कामे अधिक वेगाने पूर्ण होऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले.
कस्तुरबा भाजी मार्केटमधील विविध समस्यांबाबत मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे निवेदन दिले. यामध्ये दीर्घकाळापासून बंद असलेल्या स्त्री व पुरुष शौचालयांची दुरवस्था, स्वच्छतेचा अभाव आणि व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा समावेश होता. याची दखल घेत आयुक्तांनी शौचालये तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्याचे आदेश दिले.
शहरातील उद्याने, सार्वजनिक स्थळे आणि भाजी मंडई परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असून, सार्वजनिक सुविधांच्या दर्जात्मक वाढीसाठी आगामी काळात आणखी उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी यावेळी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षावर आयुक्तांनी नाराजी
कस्तुरबा मार्केट परिसरातील जुन्या इमारतीवर वाढलेली झाडे आणि गळणारे पत्रे यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याची बाबही पाहणीदरम्यान समोर आली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षावर आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत धोकादायक झाडे तात्काळ हटवून परिसर सुरक्षित करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Post Views: 16