सोलापूर : श्री सिद्धेश्वर तलाव हा सोलापूरची ओळख आहे. राज्य सरोवर संवर्धन योजनेच्या माध्यमातून तलावाचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन, जलगुणवत्तेत सुधारणा आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून सर्व संबंधित विभाग, तज्ज्ञ संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने तलाव अधिक स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक करण्यात येईल,असे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले.
शहराची सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यावरणीय ओळख असलेल्या श्री सिद्धेश्वर तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी सोलापूर महानगरपालिकेने प्रयत्नांना गती दिली आहे. पर्यावरण संवर्धन विभागामार्फत राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत (State Lake Conservation Plan) सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, नगरसेविका रोहिणी तडवळकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, उपायुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, कार्यकारी आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, रामचंद्र पेंटर, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, स्वप्निल सोलनकर, निखिल मोरे , सूरज सुतार , इंद्रजीत पाटील तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्राप्त सूचनांच्या आधारे तलाव संवर्धन आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
भविष्यातील सुशोभीकरणाच्या
उपाययोजनांवर सविस्तर चर्चा
बैठकीत श्री सिद्धेश्वर तलावाची सद्यस्थिती, राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे, तलावाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाबाबत प्रिमूव कन्सल्टन्सी यांचे सादरीकरण तसेच एमॲप्पल ईएम वन (Maple EM-1 )या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या लिक्विड बायोरिमेडिएशन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. तलावातील जलगुणवत्ता सुधारणा, पर्यावरणीय संतुलन राखणे, प्रदूषण नियंत्रण तसेच भविष्यातील सुशोभीकरणाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.
Post Views: 11