सोलापूर – जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात सुरू झालेल्या राजकीय हालचालींनी अनेक जुन्या समीकरणांना हादरे दिले असून, या संपूर्ण घडामोडींच्या केंद्रस्थानी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे नाव चर्चेत आले आहे.
विधान परिषद निवडणूक ही सामान्यतः मर्यादित मतदारांची निवडणूक मानली जाते. मात्र यावेळी सोलापूर जिल्ह्यात या निवडणुकीने व्यापक राजकीय स्वरूप धारण केले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने विविध पक्ष, गट, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, माजी पदाधिकारी आणि प्रभावी नेत्यांच्या बैठका, चर्चा आणि संपर्क मोहिमा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या सर्व प्रक्रियेत पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राजकीय संपर्क वाढविल्याचे चित्र दिसून येत आहे.
महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी गोरे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सक्रिय दौरे केले. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी लोकप्रतिनिधी तसेच विविध राजकीय गटांतील प्रभावी कार्यकर्त्यांशी त्यांनी थेट संवाद साधला. विशेष म्हणजे, परंपरेने विशिष्ट राजकीय गटांशी निष्ठावान मानले जाणारे काही स्थानिक नेतेही या नव्या राजकीय संवादाचा भाग बनल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यातील पारंपरिक राजकीय बालेकिल्ल्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, गोरे यांनी केवळ महायुतीच्या चौकटीत राहून राजकारण केलेले नाही, तर विरोधी गटांतील नाराज आणि उपेक्षित नेत्यांशीही संवाद साधण्याची रणनीती अवलंबली. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील मतभेद बाजूला ठेवून विविध राजकीय प्रवाहांतील व्यक्तींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील राजकीय केंद्रबिंदू हळूहळू बदलत असल्याचे चित्र समोर येत आहे.
सोलापूरच्या राजकारणात काही गटांचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, बाजार समित्या, साखर कारखाने आणि विधानसभा निवडणुकांमधील प्रभावाच्या बळावर अनेक नेत्यांनी आपले स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केले. मात्र काळानुसार बदलणारी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती नव्या नेतृत्वालाही संधी निर्माण करून देत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हीच प्रक्रिया अधिक स्पष्टपणे दिसून येत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सध्या एकच चर्चा रंगली आहे. सोलापूरच्या राजकारणात नवीन सत्ता केंद्र आकार घेत आहे का? कारण गेल्या काही महिन्यांत विविध तालुक्यांतील राजकीय घडामोडी पाहता, अनेक नेते आपल्या पारंपरिक राजकीय भूमिकांमध्ये बदल करताना दिसत आहेत. काही ठिकाणी नव्या मैत्री निर्माण होत आहेत, तर काही ठिकाणी जुनी समीकरणे कमकुवत होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
राजकारणातील एक महत्त्वाचा नियम म्हणजे सत्ता आणि प्रभाव कायमस्वरूपी कोणाकडेच राहत नाही. बदलत्या परिस्थितीनुसार राजकीय नेतृत्वालाही स्वतःमध्ये बदल करावे लागतात. सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या घडामोडींकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि सहकार क्षेत्रातील सत्तासंघर्ष यांचा पाया या निवडणुकीतून मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे.
चौकट
राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता
विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे. हा निकाल केवळ एका उमेदवाराच्या विजय-पराभवापुरता मर्यादित राहणार नाही, तर भविष्यातील राजकीय नेतृत्व, गटबांधणी आणि सत्तेच्या केंद्रांचे नवे गणित ठरविणारा ठरू शकतो. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चौकट
राजकारणात वाहू लागले बदलाचे वारे
सध्या तरी राजकीय वर्तुळात एकच प्रश्न चर्चिला जात आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात होणार की पारंपरिक राजकीय ताकदी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करणार? या प्रश्नाचे उत्तर निकालानंतर मिळेल; मात्र जिल्ह्याच्या राजकारणात बदलाचे वारे वाहू लागल्याची जाणीव आता सर्वांनाच होऊ लागली आहे.
Post Views: 17