सोलापूर – नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने वितरण प्रक्रियेला गती दिली आहे. जिल्ह्यातील १५९० शाळांमध्ये गणवेश उपलब्ध झाले असून सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांना त्यांचे वितरण करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच टप्प्यात गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोफत गणवेश योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील एकूण २८४१ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या २७६८ तर नगरपरिषदांच्या ७३ शाळांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सुमारे १ लाख ८७ हजार विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक विद्यार्थ्यास दोन गणवेशांसाठी एकूण ६०० रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यापैकी पहिल्या नियमित गणवेशासाठी ८० टक्के प्रमाणात प्रति विद्यार्थी २४० रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.
या योजनेसाठी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या ४ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीचे तालुकानिहाय वाटप करण्यात आले असून शाळास्तरावर खरेदी व वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्या उपलब्ध झालेले गणवेश एकूण गरजेच्या सुमारे ४३ टक्के आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनाही लवकरात लवकर गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे.
शाळा व्यवस्थापन समित्या, मुख्याध्यापक आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून वितरणाची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येत आहे. मोफत गणवेश योजना ही केवळ आर्थिक मदत नसून विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना निर्माण करणारी महत्त्वाची योजना मानली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील शैक्षणिक खर्चाचा भार कमी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठीही या योजनेची मदत होत आहे.
कोट
नवीन शैक्षणिक वर्षात गणवेश, पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अधिक चालना मिळणार असल्याचे पालकांनी सांगितले.
चौकट
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
जिल्ह्यातील एकूण शाळा : २८४१
जिल्हा परिषद शाळा : २७६८
नगर परिषद शाळा : ७३
लाभार्थी विद्यार्थी : १.८७ लाख
गणवेश उपलब्ध शाळा : १५९०
वितरणासाठी तयार गणवेश : ८० हजार
प्राप्त निधी : ₹४.३३ कोटी
प्रति विद्यार्थी अनुदान : ₹६०० (दोन गणवेशांसाठी)
Post Views: 6