सोलापूर : आपल्या आई -वडिलांच्या कष्ट आणि संघर्षाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर उज्वल यश संपादन करावे. उच्च पदस्थ अधिकारी व्हावे.आजचे युग हे स्पर्धेचे, ज्ञानाचे आणि कौशल्याचे असून विद्यार्थ्यांनी केवळ गुणांवर समाधान न मानता गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. मोठी स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण परिश्रम करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन डॉ. श्रीकांत येळेगावकर, ॲड. अभिजीत ढोबळे यांनी केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या माध्यमातून सौ. सुमतीबाई दत्तात्रय येळेगावकर यांच्या सन्मानार्थ प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर आणि शाहू शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. अभिजीत ढोबळे यांच्या देणगीतून पत्रकारांच्या पाल्यांना पत्र महर्षी रंगाअण्णा वैद्य स्मृती शिष्यवृत्ती आणि दिवंगत संपादक बाबुराव जक्कल स्मृती शिष्यवृत्ती वाटप
समारंभ उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, महात्मा फुले सूतगिरणीचे चेअरमन ॲड. अभिजीत ढोबळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे , खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले. स्वागत कार्यकारणी सदस्य प्रीतम पंडित यांनी केले.
सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी तर उपाध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. श्रीकांत येळेगावकर म्हणाले, आज मिळालेले गुण हे यशाचे अंतिम मोजमाप नाही. गुणांपेक्षा गुणवत्ता अधिक महत्त्वाची आहे. गुणवत्ता ही अपघाताने मिळत नसून सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित असते.यशस्वी व्यक्तींच्या जीवनचरित्राचा अभ्यास करण्याचे आवाहन करताना त्यांनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, उच्च ध्येय आणि कठोर परिश्रम या गुणांमुळेच महान व्यक्तिमत्त्वे घडतात. स्वतःच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतल्याच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःमध्ये यशाची
ठिणगी पेटवावी : ॲड. अभिजीत ढोबळे
ॲड. अभिजीत ढोबळे म्हणाले, बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी पालकांना मोठा आर्थिक संघर्ष करावा लागतो, याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावी. आई-वडिलांनी शिक्षणासाठी घेतलेले कर्ज आयपीएस, आयएएस, एमपीएससीसारख्या उच्च पदांवर जाऊन फेडण्याचा निर्धार प्रत्येकाने करावा. श्रमिक पत्रकार संघाने पत्रकारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती व मार्गदर्शनाच्या माध्यमातून केलेले कार्य कौतुकास्पद आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःमध्ये यशाची ठिणगी पेटवून समाजात वेगळी ओळख निर्माण करावी तसेच पत्रकारांच्या लेखणीची ताकद समाजाला दिशा देणारी असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे आवाहन ॲड. अभिजीत ढोबळे यांनी केले.
Post Views: 10