टेंभुर्णी – माढा तालुक्यातील सापटणे गावच्या हद्दीत पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास धक्कादायक चोरी व मारहाणीची घटना घडली असून, तीन अनोळखी इसमांनी चालक व मालकाला मारहाण करून तब्बल १० लाख ३४ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी नामदेव नांदे (वय ४५, व्यवसाय – शेती, रा. वीरवाडी नं.२, मदनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) हे कांद्याचा माल घेऊन आपल्या पिकअप वाहनातून प्रवास करत होते. दिनांक १८ जून २०२६ रोजी मध्यरात्री १२.०५ वाजण्याच्या सुमारास सापटणे गावच्या शिवारात राजस्थान ढाब्याच्या पुढे सुमारे तीन किलोमीटर अंतरावर पुणे–सोलापूर हायवेवर ही घटना घडली.
फिर्यादीनुसार, पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील तीन अनोळखी इसमांनी पिकअप वाहन अडवले. त्यांनी चालक खादीर फकोरूददीन मोहंमद (वय ४३, रा. हादनूर, ता. न्यायकल, जि. संगारेड्डी, तेलंगणा) याला “गाडी नीट चालविता येत नाही का” असा जाब विचारत वाहन थांबवले. त्यानंतर चालकास तसेच फिर्यादीस हाताने आणि कोणत्यातरी हत्याराने मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेत आरोपींनी वाहनासह कांद्याचा माल व इतर साहित्य घेऊन पलायन केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
चोरीस गेलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे :
• ४३ पोती कांदा (प्रत्येकी ५० किलो) – एकूण २१५० किलो किंमत अंदाजे ₹३२,२५०
• पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो नवीन बिगर पासिंग पिकअप जीप – किंमत अंदाजे ₹१०,००,०००
• टेक्नो कंपनीचा मोबाईल फोन – किंमत अंदाजे ₹२,०००
• चालकाची कागदपत्रे असलेली बॅग – किंमत अंदाजे ₹१००
असा एकूण ₹१०,३४,३५० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गु.र. नं. ४१६/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०९(६), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद दिनांक १८ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.४७ वाजता करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश बावकर करत असून यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हेड कॉन्स्टेबल नलावडे करत आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.