सोलापूर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटीकल एज्युकेशन अँड रिसर्च (एनआयपीईआर) तर्फे राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या ‘जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन २०२६’ (संयुक्त प्रवेश परीक्षा) मध्ये दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाच्या ‘कॉलेज ऑफ फार्मसी, सोलापूर’च्या एकूण सहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
हे सर्व यशस्वी विद्यार्थी संगणक आधारित चाचणीच्या (सीबीटी) विद्यावेतनासह एम.एस. (फार्मा.), एम.फार्मा., एम.टेक. आणि पीएच.डी. या उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. संपूर्ण भारतात अहमदाबाद, गुवाहाटी, हाजीपूर, हैदराबाद, कोलकाता, मोहाली आणि रायबरेली अशा एकूण सातच ठिकाणी ‘एनआयपीईआर’चे मुख्य कॅम्पस (संस्था) असून, या नामवंत संस्थांमध्ये या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता यादीत मानसी गोवर्धन डिडवाणी (क्रमांक- ९७), पारिक कुमार भागवत (क्रमांक- ६४०), वैष्णवी पद्मुखे (क्रमांक- ६७२), अन्सारी मोहम्मद हनीफ जैनुद्दीन (क्रमांक- ९५२), सानिका शांताराम शिंदे (क्रमांक- १२३८) आणि यामिनी देवीचंद्र ढगे (क्रमांक- १२६५) या विद्यार्थ्यांनी बाजी मारत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या अद्वितीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व चेअरमन राजशेखर शिवदारे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे विश्वस्त प्रा. डॉ.भीमाशंकर शेटे यांनीही विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
”कै. वि. गु. शिवदारे अण्णा यांनी ज्या पवित्र उद्देशाने दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाची स्थापना केली, तो उद्देश आज खऱ्या अर्थाने पूर्ण होताना दिसत आहे. महाविद्यालयाने आपली यशाची परंपरा देश पातळीवर कायम राखली आहे,” अशा शब्दांत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी आणि पालक वर्गाकडून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 14