अकलूज – सत्ताधारी म्हणतात विधान परिषदेची निवडणूक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या इगो मुले लागली. अन्यथा बिनविरोध झाली असती. पण ही निवडणूक मी लावलेली नाही. शरद पवार साहेबांनी सांगितले होते कि, पराभव झाला तरी चालेल. पण निवडणूक बिनविरोध होता कामा नये. मी त्यांच्या आदेशाचे पालन केले आहे. जिल्ह्यात कुठेही काहीही झाले कि ही मंडळी मोहिते पाटलांवर आरोप करतात. आमच्यावर आरोप केल्याशिवाय यांची दुकानदारी चालत नसल्याची खरमरीत टीका खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सत्ताधाऱ्यावर केली.
खा. मोहिते पाटील म्हणाले, सत्ताधारी स्वतःच म्हणत होते कि माझ्याकडे फक्त 16 मते आहेत. आता म्हणत आहेत कि मोहिते पाटलांची अदृश्य शक्ती चालली नाही. माझी अदृश्य शक्ती चालली म्हणूनच आम्हाला 118 मते मिळाली आहेत. आमचे विरोधक असेही म्हणतात कि, एवढीच मोहिते पाटलांना खुमखूमी होती तर घरचा उमेदवार उभा करायचा. आम्ही घरचा उमेदवार दिला असता तर हे म्हणाले असते कि मोहिते पाटील घराणेशाही करतात. यांचे आमच्याशी जमत नाही आणी आणी यांना आमच्याशिवाय करमत ही नाही.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी यांनी आमच्याशी चर्चा केली नाही. चर्चा आमच्याशी करायची नव्हती तर आमच्या वरिष्ठ नेत्यांशी करायची होती. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या जागी जर चंद्रकांतदादा पाटील असते तर त्यांनी सर्वांना एकत्र बोलवले असते. सगळ्यातून सुवर्णमध्य काढून निवडणूक बिनविरोध केली असती. खरे तर ही निवडणूक पालकमंत्र्यांच्या इगोमुळे लागली.
महाविकास आघाडीच्या ज्या पदाधिकऱ्यांनी, आमदार व इतर पुढाऱ्यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीचे काम न करता महायुतीला मदत केली त्यांच्यावर पक्ष श्रेष्ठी कारवाई करतील. मी कोणाचीही तक्रार करणार नाही. सत्ताधारी म्हणतात, मोहिते पाटलांमुळे डीसीसी बँक डबघायीला आली. आमच्याकडे डिसिसीची थकबाकी आहे. पण ते प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. कोणाच्या काळात डीसीसी बँकेत सर्वात जास्त ठेवी होत्या, सर्वात मोठी कर्जमाफी कोणाच्या काळात झाली, कोणाच्या काळात बँक कशी चालली हे जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. उगीच आमच्यावर खोते आरोप केले जात आहेत.
मी खासदार म्हणून माढा मतदार संघात व सोलापूर जिल्ह्यात पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार आहे. आमचे विरोधक हे दोन्ही तोंडाने आमच्यावर टीका करतच राहणार आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी मतदार संघाच्या विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.
निवडणूक झाली. राजेंद्र राऊत निवडून आले. त्यांना आमच्याकडून शुभेच्छा.