
सोलापूर – जिल्हा परिषद सोलापूरच्या अर्थ व बांधकाम समितीच्या बैठकीत कृषी विभागाला जिल्हा परिषद सेस निधीतून अधिक आर्थिक तरतूद करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि शेतकरी हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हा मुद्दा बैठकीचा केंद्रबिंदू ठरला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य चरण हनुमंत चवरे, अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील, पुनम सुदर्शन इंगवले, रेश्मा देवेंद्र डोके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २४) ही बैठक पार पडली. बैठकीत विविध आर्थिक व प्रशासकीय विषयांचा आढावा घेण्यात आला. सुरुवातीला दि. २६ मे रोजी झालेल्या मागील बैठकीच्या कार्यवृत्तांतास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या नव्या शासन निर्णयांचे वाचन करून त्यांची नोंद घेण्यात आली. अर्थ विभागाच्या लेखा विषयक नोंदवह्यांचा आढावा घेऊन त्या अद्ययावत असल्याचे समितीने नमूद केले.
बैठकीदरम्यान सभापतींच्या परवानगीने आयत्या वेळचे काही महत्त्वाचे विषयही चर्चेस घेण्यात आले. विशेषतः कृषी विभागाच्या विविध योजनांची व्याप्ती वाढत असल्याने जिल्हा परिषद सेस निधीतून अतिरिक्त आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत सदस्यांनी चर्चा केली. यामुळे शेतकरी केंद्रित उपक्रमांना बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कोट
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, आर्थिक शिस्त राखणे आणि उपलब्ध निधीचा लोकहितासाठी परिणामकारक वापर करणे या दृष्टीने समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेला दिशा देण्यात आली.
– इंद्रजीत पवार,उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ व बांधकाम विभाग
Post Views: 38