बार्शी – थोर समाजसुधारक, शिक्षणमहर्षी व बहुजनांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती तसेच राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था श्रीपतपिंपरी या संस्थेचा २० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संभाजी घाडगे व संस्थेच्या सचिवा सौ. वर्षा घाडगे, माजी. मुख्याध्यापक गोवर्धन घाडगे, संकेत घाडगे आणि इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी प्रशासकीय अधिकारी किशोर कदम, फिजिकल कोच जे. बी. शिंदे (मेजर), सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण, सामाजिक समता, आरक्षण, स्त्रीशिक्षण व बहुजनांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगण्यात आले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली. तसेच सामाजिक संदेश देणारा नाट्यप्रयोगांमधून समता, बंधुता व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण जिजाऊ गुरुकुल खांडवी परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांचे संस्कार रुजविण्यासाठी अध्यक्ष संभाजी घाडगे यांनी महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारस कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
Post Views: 30