
सोलापूर – येथील पद्मश्री सुमतिबाई शहा ट्रस्ट संचलित ‘उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय’ येथे सलग २५ वर्षे अविरत ज्ञानदान करून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे यांचा भव्य सेवानिवृत्ती सत्कार व निरोप समारंभ श्राविका विद्यालयाच्या प्रांगणात भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रिसिजन कंपनीचे समन्वयक माधव देशपांडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून श्राविका संस्थेच्या मार्गदर्शिका दीप्ती शहा, मुख्याध्यापिका आश्विनी पंडित, उपमुध्यापिका माधवी खोत आणि पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. मुख्याध्यापिका आश्विनी पंडित आणि इतर सहकाऱ्यांच्या हस्ते सुकुमार मोहोळे व त्यांच्या पत्नीचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापिका अश्विनी पंडित यांनी प्रास्ताविक केले सेमी इंग्रजी माध्यम, फाउंडेशन वर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रात्रअभ्यासिका यांसारख्या अनेक नवोपक्रमांद्वारे सरांनी विद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी घेतलेल्या परिश्रमांचा त्यांनी उल्लेख केला. या सोहळ्यात शाळेतील शिक्षकांच्या अनुभवांवर आधारित ‘स्मृतिगंध’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रा. गणेश लेंगरे, सुहास छंचुरे, विद्यार्थिनी रामेश्वर बंडगर, श्रेया कांबळे, पालक प्रतिनिधी पोपटराव कोंडुभैरी, ओहळ आणि सरांचे बंधू इंद्रजीत मोहोळे यांनी सरांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.
सत्काराला उत्तर देताना सुकुमार मोहोळे भावूक झाले. त्यांनी आपला जीवनप्रवास उलगडत संस्थेचे विश्वस्त, सहकारी आणि विद्यार्थ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “शाळेतून अधिकृतपणे निवृत्त होत असलो, तरी विद्यार्थ्यांच्या मनात आणि शैक्षणिक कार्यात सदैव जोडलेला राहीन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यालयाच्या प्रगतीसाठी त्यांनी पाच ‘स्मार्ट बोर्ड’ भेट देण्याचे जाहीर केले व त्यातील एका बोर्डच्या रकमेचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला.
प्रतीक्षा मोहोळे व निवृत्त प्राध्यापक राजकुमार नवले यांनीही यावेळी आपले विचार मांडले. अध्यक्षीय समारोप करताना माधव देशपांडे यांनी सरांच्या २५ वर्षांच्या निष्कलंक सेवेचा गौरव करत, त्यांचे कार्य पुढील पिढीसाठी प्रेरणादायी राहील असे सांगितले. त्यांनी सरांना पुढील निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन पल्लवी खांडवे व अनुप कस्तुरे यांनी केले, तर आभार सोनाली उंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख राजश्री आगरखेड, अनंत बेळळे, अभिजीत पाटील, अभिनंदन उपाध्ये यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रवीण कंदले यांनी फलकलेखन तर केतकी सोनटक्के यांनी रांगोळी रेखाटली होती. या सोहळ्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
——























