पंढरपूर – आषाढी यात्रेच्या दरम्यान वारकऱ्यांना सुविधा देण्या बरोबरच यावर्षी जिल्ह्यातील पालखी मार्गावरील ८१ ग्रामपंचायतींच्या हदीमध्ये तब्बल १० हजार देशी वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा प्रथमच पुणे व सातारा पालखी मार्गावरील पालख्यांचे नियोजन सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत होत आहे. यंदा सोलापूर जिल्हा परिषदे अंतर्गत आषाढी वारीचे मोठे नियोजन सुरू आहे.
महाराष्ट्राचा सर्वात मोठा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा म्हणून आषाढी वारीकडे बघितले जाते. यंदा २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असून यासाठी काही पालख्यांचे प्रस्थान झाले आहे तर उर्वरित पालख्या जुलै महिन्यात मार्गस्थ होणार आहेत. मागील काही वर्षापासून पालखी मार्गाची मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. रस्ते मोठे झाले, यासाठी वृक्षतोड करण्यात आली. यामुळे चालताना भाविकांना सावली कमी प्रमाणात मिळत आहे. याची दखल घेऊन जिल्हा परिषद कृषी विभागाने दहा हजार देशी वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या पंढरपूर येथे आयोजित विशेष सभेमध्ये नियोजन करण्यात आले.
————————
चौकट : ( केवळ देशी वृक्षांची होणार लागवड )
सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ८१ ग्रामपंचायत हद्दीमध्ये वड, पिंपळ, कडुनिंब, करंज, चिंच, बेहडा, ताम्हण, आपटा, कवठ व अशोक वृक्षांची लागवड होणार आहे.
————————-
चौकट : ( मेडिसीन किटचे करण्यात येणार वाटप )
दरम्यान, मानाच्या व प्रमुख पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर दिंडी प्रमुखांना साडेचार हजार मेडिसीन किट वाटप करण्यात येणार आहे. तसेच उन्हाची तीव्रता वाढली तर ओआरएस पाकीटे देखील वाटण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या किटमध्ये आवश्यक औषधे पेयजेल यांचा समावेश आहे.
————————-
चौकट : ( असे करण्यात आले आहे वृक्ष लागवडीचे नियोजन )
( तालुका, ग्रामपंचायतींच्या संख्या आणि वृक्षलागवडीची संख्या अशी पुढील प्रमाणे आकडेवारी दिलेली आहे )
पंढरपूर – २३ – ३,०००. माढा – १४ – ११००. माळशिरस – २५ – ३०००. मंगळवेढा – ३ – ५००. मोहोळ – ५ – १०००. करमाळा – ५ – १०००. बार्शी – ४ – १००. उत्तर सोलापूर – १ – १५०. दक्षिण सोलापूर – १- १५०.
Post Views: 7