सोलापूर : सक्षम व विकसित भारत घडविण्याच्या उद्देशाने वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सच्या कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 12 वी विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांसाठी जेलरोड पोलीस स्टेशनतर्फे “नशामुक्त महाराष्ट्र” जनजागृती अभियानांतर्गत पोलीस मित्र व विद्यार्थी संवाद या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) ज्योत्स्ना भाम्बिष्टे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्त महाराष्ट्र अभियानाची माहिती देत पोस्को कायद्यांतर्गत बालक व बालिकांच्या संरक्षणासंबंधीच्या कायदेशीर तरतुदींची माहिती विविध उदाहरणांसह दिली. तसेच विद्यार्थ्यांनी जीवनातील कोणताही निर्णय घेताना आई-वडिलांशी मित्रत्वाने संवाद साधावा, कोणतीही गोष्ट त्यांच्यापासून लपवू नये आणि चुकीच्या गोष्टींना ठामपणे नकार द्यावा, असे आवाहन केले.
जेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विकसित भारतासाठी निरोगी व व्यसनमुक्त समाजाची गरज अधोरेखित केली. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांना नकार देऊन अभ्यास, वाचन आणि चांगल्या सवयींची आवड निर्माण करण्याचा संदेश दिला.
सोलापूर शहर डिव्हिजन–वनचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) प्रताप पोमन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलीस हे समाजाचे मित्र असल्याचे सांगितले. निरोगी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे व्यसनमुक्ती असल्याचे नमूद करत त्यांनी चांगली मैत्री, योग्य संगत, योग, व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व पटवून दिले. “नशा सोडून आशादायी जीवन जोडा आणि उद्याचे सक्षम नागरिक बना,” असा संदेश त्यांनी दिला.
उपप्राचार्य अनुप म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अशा प्रबोधनपर उपक्रमांचा लाभ घेऊन व्यसनांपासून दूर राहण्याचे आणि यशस्वी करिअर घडविण्याची जिद्द मनात निर्माण करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, एसीपी प्रताप पोमन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना भाम्बिष्टे, पोलीस हवालदार आफरीन मुजावर, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख राहुल हजारे, सहशिक्षक शंकर जनगोंड व प्रवीण सुतार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन तुपकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल हजारे यांनी केले.
Post Views: 9