पिलीव – शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देऊन प्रशासनाला सहकार्य केल्याचा राग मनात धरून माळशिरस तालुक्यातील निमगाव येथील शेतकरी व पत्रकार निनाद पाटील यांना अज्ञात लोकांकडून अप्रत्यक्षपणे त्रास दिला जात असून, रात्री-अपरात्री त्यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या धक्कादायक प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मेसेजद्वारे आलेल्या तक्रारीवरून तात्काळ दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर, माळशिरस तालुका शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीच्या वतीने सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना या गंभीर प्रकरणाबाबत नुकतेच एक सविस्तर निवेदन देण्यात आले.
शक्तीपीठ महामार्ग माळशिरस तालुक्यातील १२ गावांमधून जात असून, या महामार्गाबाबत तालुक्यात विरोध आणि समर्थन अशा दोन्ही बाजू दिसून येत आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी या महामार्गाला उघडपणे समर्थन दिले आहे, अशा शेतकऱ्यांना काही अज्ञात लोकांकडून अप्रत्यक्षपणे दमदाटी केली जात असल्याचे समोर आले आहे. निमगाव येथे घडलेल्या या प्रकारानंतर पोलीस प्रशासनालाही याबाबतीत गोपनीय माहिती मिळाली आहे. यानुसार पोलिसांनी संबंधित शेतकऱ्यांना अधिक सावध व जागरूक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून सर्व बाबी जाणून घेतल्या आणि अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ज्या शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे, त्यांनी प्रशासनाला शक्तीपीठ महामार्गासंदर्भात वेळोवेळी सहकार्य केले आहे. त्यामुळे अशा कायद्याचे पालन करणाऱ्या आणि सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
चौकट –
❝ धमक्यांना भीक घालत नाही; गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईल हा विश्वास! ❞
”शक्तीपीठ महामार्गाचे समर्थन करून प्रशासनाला सहकार्य केल्याचा राग मनात धरून काही समाजकंटकांकडून माझ्या गाडीचा रात्री-अपरात्री पाठलाग केला जातोय. हस्ते-परहस्ते मला मारण्याची धमकीही दिली जातेय. पोलिसांकडून मला सतर्क राहण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. परंतु चळवळीत काम करणारा कार्यकर्ता, पत्रकार व शेतकरी म्हणून मी अशा धमक्यांना अजिबात भीक घालत नाही. मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित लोकांचे सीडीआर (CDR) लवकरच पोलिसांना मिळतील. अशा गुन्हेगारांवर नक्कीच कठोर कारवाई होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
निनाद पाटील (समन्वयक, शक्तीपीठ महामार्ग समर्थन समिती, माळशिरस तालुका)
फोटो ओळी: शक्तीपीठ महामार्गास समर्थन व प्रशासनास सहकार्य करणारे निमगाव येथील शेतकरी निनाद पाटील यांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना देताना माळशिरस तालुका शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीचे सदस्य व समन्वयक