सोलापूर : ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने व धान फाउंडेशनच्या माध्यमातून समुदाय आर्थिक साक्षरता केंद्र अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या आर्थिक साक्षरता अभियानाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून तोगराळी येथे “आर्थिक समावेशन आदर्श गाव घोषणा कार्यक्रम” उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेश हणमंत पाटील साहेब होते. यावेळी उपसरपंच गंगूबाई कोळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच अन्नपूर्णा धेंडे, रेणुका मेहत्रे, सविता पुजारी आणि कल्पना पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यात राबविण्यात आलेल्या आर्थिक साक्षरता अभियानांतर्गत नागरिकांना बचतीचे महत्त्व, विविध शासकीय योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, अटल पेन्शन योजना, आयुष्मान भारत योजना, डिजिटल बँकिंग, ऑनलाइन व्यवहार, एटीएमचा सुरक्षित वापर तसेच आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते “आर्थिक समावेशन आदर्श गाव” घोषणा फलकाचे अनावरण करण्यात आले. गावातील प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम व बँकिंग सेवांशी जोडले जावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुदाय आर्थिक साक्षरता केंद्र, दक्षिण सोलापूरचे तालुका समन्वयक किशोर झेंडेकर यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आर्थिक साक्षरतेचे महत्त्व विशद केले व उपस्थितांचे स्वागत केले.




















