सोलापूर – राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी केलेले नियोजन, विविध आरोग्य मोहिमांची प्रभावी अंमलबजावणी आणि टीबी निर्मूलनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.एस.टी.एस. मंडळाचे राजशेखर शिवदारे होते. कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट, विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि डी.एस.टी.एस. मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवदारे कॉलेज येथे राष्ट्रीय डॉक्टर्स डे आणि सीए डे निमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. विजय कानेटकर यांच्या हस्ते डॉ. कोपूरवाड यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. डॉ. कोपूरवाड यांनी यापूर्वी नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असताना राबविलेल्या ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला होता. तसेच केंद्र शासनाच्या निकषांनुसार टीबी निर्मूलन कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याने राज्यात चौथा क्रमांक पटकावला होता. त्यांच्या नियोजनक्षम नेतृत्वामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची राज्यभर दखल घेतली गेली होती.
एप्रिल २०२६ पासून सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वितरण, लसीकरण मोहिमा, माता-बाल आरोग्य सेवा, जनजागृती उपक्रम आणि विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे. या सर्व कार्याचा गौरव म्हणून त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. कोपूरवाड यांनी हा सन्मान संपूर्ण आरोग्य विभागाच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला, विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविणे हेच आपले सर्वोच्च प्राधान्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Post Views: 18