सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या कारभारात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या स्वतंत्र बजेट असलेल्या महिला व बालकल्याण समितीसह विविध ७ समित्यांच्या सभापतीपदासाठी शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात पुणे विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम २१ तसेच समिती सभापती निवडणूक नियम २००७ व २००८ मधील तरतुदीनुसार अधिकृत आदेश निर्गमित केला आहे.
शासनाने मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमाचे नियम २००७ आणि २००८ च्या अधिसूचनेनुसार सुधारणा करून मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम २००८ मध्ये संमत केलेले असून त्यानुसार समित्या व इतर समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीसाठीच्या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त अथवा त्यांच्या प्रतिनिधी असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार, दि. ३ मे रोजी महापालिका कौन्सिल हाॅलमधील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापालिकेच्या स्थापत्य समिती, वैद्यकीय सहाय व आरोग्य समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती, मंड्या व उद्यान समिती, कामगार व समाज कल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती या सभापती पदाची ही निवडणूक प्रक्रिया याच क्रमवारीनुसार पार पडेल. सकाळी ११ वाजता, यानंतर एकेक समितीला टप्प्याटप्प्याने ११:३०, १२ आणि दुपारी १२:३०, १, व २ वाजता प्रत्येक समितीसाठी स्वतंत्रपणे मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत हात उंचावून मतदान पद्धतीने सभापतींची निवड केली जाणार आहे. या निवडणुकीनंतर महापालिकेच्या विविध समित्यांची नव्याने रचना होऊन पुढील वर्षांचा कारभार अधिक वेगाने होण्याची अपेक्षा आहे.
नगरसेवकांची उत्सुकता
महापालिकेत सध्या भाजपाचे १०२ पैकी ८७ सदस्य असून आमदारांच्या गटांमध्ये सभापतीपदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद सर्वात महत्त्वाचे मानले जात असल्याने त्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे. आरोग्य आणि शहर सुधारणा, स्थापत्य समितीकडेही विशेष लक्ष आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
स्वतंत्र निधी समितीसाठी कोणाची वर्णी लागणार
महापालिकेच्या विशेष सात समित्यांमध्ये प्रत्येक समितीत ९ सदस्य असून यामध्ये भाजपाचे ८ तर एमआयएमचा १ सदस्य आहे. या समित्यांमध्ये प्रथमच काँग्रेससह शिवसेनेचा एकही सदस्य नाही. महिला व बालकल्याण समितीत भाजपाचे सुनिता कामाठी, मंदाकिनी तोडकरी, वंदना गायकवाड, मृण्मयी गवळी, पूजा वाडेकर, श्वेता खरात, सुमन चाबुकस्वार, निर्मला जंगम (भाजपा) सफिया चौधरी (एमआयएम) असे असून भाजपाच्या सदस्यांमधून या स्वतंत्र निधी व सभापतींना वाहन असलेल्या समितीवर कोणाची वर्णी लागणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
या ७ समित्यांच्या सभापती पदाची होणार निवड
महापालिकेच्या दैनंदिन कारभारावर थेट परिणाम करणाऱ्या स्थापत्य समिती, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती, मंड्या व उद्यान समिती, कामगार व समाज कल्याण समिती आणि महिला व बाल कल्याण समिती या ७ समित्यांच्या सभापतीपदासाठी मतदान होणार आहे. या समित्या महापालिकेच्या बजेट, विकासकामे, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि सामाजिक योजनांवर निर्णय घेतात.
नगरसचिव कार्यालयात आज
नामनिर्देशपत्र करणार दाखल
विविध समिती सभापती या पदासाठी विहित नमुन्यातील नामनिर्देशपत्र दिनांक २ जुलै २०२६ रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत नगरसचिव, नगरसचिव यांचे कक्षात, कॉन्सिल हॉल, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर येथे स्विकारतील.
विहित नमून्यातील नामनिर्देशनपत्र नगरसचिव कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.
Post Views: 18