सोलापूर : पावसाळ्यात जीवाची पर्वा न करता शहराची स्वच्छता आणि ड्रेनेज व्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील वर्ग-४ कर्मचारी तसेच सार्वजनिक अभियंता (ड्रेनेज) विभागातील कर्मचाऱ्यांना तातडीने पावसाळी रेनकोट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने महापौर विनायक कोंडयाल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात झाडूवाले, सफाई कर्मचारी, गटार बिगारी व ड्रेनेज बिगारी हे कर्मचारी पावसात भिजत नियमित सेवा बजावत असून त्यामुळे विविध आजारांचा धोका वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरवर्षी महापालिकेकडून रेनकोट उपलब्ध करून दिले जात असले, तरी यंदा अद्याप त्यांचे वितरण झाले नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. यावर महापौर विनायक कोंडयाल यांनी संबंधित विभागाला तातडीने आवश्यक सूचना देऊन रेनकोट वाटपाची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
यावेळी कामगार नेते बापूसाहेब सदाफुले, सफाई कामगार नेते श्रीनिवास रामगल, ट्रेड युनियनचे मार्गदर्शक इकबाल तडकल, खजिनदार अरुण म्हेत्रे, नरेश कदम, आकाश शिवशरण यांच्यासह ट्रेड युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 24