सोलापूर : अवैध मद्यव्यवसाय आणि भेसळयुक्त ताडी विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर पाऊल उचलले आहे. विभागाच्या इतिहासात जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र धोकादायक व्यक्तींच्या हालचालींवर प्रतिबंध घालण्याबाबतच्या अधिनियमांतर्गत (एमपीडीए) प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी अंजुनय्या बसुराज गुत्तेदार याला स्थानबद्ध करून त्याची रवानगी पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
अंजुनय्या बसुराज गुत्तेदार हा अवैध व भेसळयुक्त ताडीचा व्यवसाय करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्याच्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी कायद्यातील तरतुदीनुसार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर त्याला स्थानबद्ध करून येरवडा कारागृहात रवाना करण्यात आले.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या आदेशानुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप आयुक्त सागर धोमकर आणि अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. सोलापूर विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप अधीक्षक सौरभ अदाटे, माळशिरस विभागाचे निरीक्षक एस. एस. भवड, तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक एस. एस. भोसले तसेच जवान प्रविण पुसावळे, योगेश पाटील आणि मारुती जडगे यांनी आवश्यक पुरावे व गुन्ह्यांची पार्श्वभूमी तपासत सखोल अभ्यास करून स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
अवैध व भेसळयुक्त ताडी विक्रेत्यांविरुद्ध केवळ नियमित गुन्हे दाखल करण्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता कायद्यातील कठोर प्रतिबंधात्मक तरतुदींचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला व सार्वजनिक सुव्यवस्थेला निर्माण होणारा धोका लक्षात घेता, यापुढेही अशा अवैध व्यवसायाविरोधात कठोर व सातत्यपूर्ण कारवाई सुरूच राहणार असून कोणाचीही गय केली जाणार नाही, असे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी स्पष्ट केले आहे.






















