सोलापूर : विज्ञान आणि गणित या विषयांचे अध्यापन अधिक कृतीशील, अर्थपूर्ण आणि परिणामकारक व्हावे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार आणि संशोधक वृत्ती रुजावी, या प्रमुख उद्देशाने व्ही. जी. शिवदारे कॉलेज, सोलापूर येथे येत्या २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्यस्तरीय नवोन्मेषी शिक्षक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
. मराठी विज्ञान परिषद (मुंबई), मराठी विज्ञान परिषद (सोलापूर विभाग) आणि दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे दोन दिवसीय अधिवेशन पार पडणार आहे. विज्ञान व गणिताच्या अध्यापनात नाविन्यपूर्ण उपक्रम आणि यशस्वी प्रयोग राबविणाऱ्या शिक्षकांना आपले अनुभव व संशोधन सादर करण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून एक भक्कम राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
. या अधिवेशनामध्ये गोव्यासह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बुलढाणा, चिपळूण, धुळे आणि विविध भागांतील सुमारे ४० प्रयोगशील शिक्षक सहभागी होणार आहेत. या शिक्षकांच्या नावीन्यपूर्ण कल्पना व अध्यापन पद्धतींची देवाणघेवाण होऊन शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. अधिवेशनादरम्यान मुंबई येथील डॉ. विवेक पाटकर आणि कॅप्टन सुनील सुळे यांचे विशेष व मोलाचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे.
. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मराठी विज्ञान परिषद सोलापूर विभागाचे अध्यक्ष प्रा. व्यं. गो. गंभीर, मुंबई विभागाचे सचिव श्री. अ. पां. देशपांडे, विश्वस्त प्रा. भीमाशंकर शेटे, डॉ. राजेंद्र आगरकर, प्राचार्य डी. एस. सूत्रावे आणि क्रांतिवीर महेंद्रकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अधिवेशनात सक्रिय व यशस्वी सहभाग नोंदविणाऱ्या सर्व शिक्षकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शिक्षकांमधील नवोन्मेषी अध्यापन कौशल्यांना प्रोत्साहन देणारे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास पूरक ठरणारे हे अधिवेशन शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
Views: 11