सोलापूर – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेची तयारी तपासण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीने कंबर कसली असून, कासेगाव येथे होणारी आरोग्य विभागाच्या विषय समितीची बैठक यंदा विशेष महत्त्वाची ठरणार आहे. वारी काळात लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियोजन, औषधांचा पुरेसा साठा आणि ग्रामीण आरोग्य केंद्रांतील सुविधांचा सखोल आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन ही बैठक कासेगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत औषध खरेदी प्रक्रिया, प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरविण्यात आलेल्या औषधांचा साठा, वैद्यकीय साहित्य, मनुष्यबळाची उपलब्धता तसेच मागील बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीचा तपशीलवार आढावा घेतला जाणार असल्याचे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले
दरम्यान, बैठकीपूर्वीच सभापती सावंत यांनी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आषाढी वारीसारखा मोठा धार्मिक सोहळा तोंडावर असतानाही आवश्यक औषध खरेदी वेळेत पूर्ण न होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याचीही त्यांनी खंत व्यक्त केली.
आरोग्य यंत्रणेतील नियोजनातील त्रुटी, विलंब आणि निष्काळजीपणाबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून बैठकीत खुलासा मागविण्यात येणार असून, समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास कडक कारवाईची शिफारस करण्यात येईल, असे संकेतही सभापतींनी दिले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये बैठकीपूर्वीच खळबळ उडाली आहे.
वारी काळात भाविकांना दर्जेदार आणि अखंड आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत असून, कासेगाव येथील ही बैठक आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेची कसोटी ठरणार असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे.
Post Views: 19