सोलापूर : बापूजी नगर येथील जीझस गॉस्पेल सोसायटीच्या समाज मंदिराबाबत प्रसारित झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे समाज मंदिराला चर्च ठरवू नका.वस्तुनिष्ठ, निष्पक्ष व पुराव्यावर आधारित चौकशी करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, बापूजी नगर येथील समाज मंदिराचा गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक तसेच समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी वापर केला जात आहे. गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, वह्या वाटप, महिला साडी वाटप, आरोग्य शिबिरे व विविध जनजागृती कार्यक्रम येथे नियमितपणे आयोजित केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.जीझस गॉस्पेल सोसायटीने या इमारतीचा ताबा सोलापूर महानगरपालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतला असून, आवश्यक शासकीय मंजुरी व करारानुसारच संस्थेचा वापर सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे समाज मंदिराला कोणताही ठोस पुरावा नसताना “चर्च” म्हणून संबोधणे किंवा त्यावर कारवाईचा निष्कर्ष काढणे कायद्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
भारतीय राज्यघटनेतील समानतेचा अधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, नैसर्गिक न्यायाची तत्त्वे तसेच भारतीय साक्ष्य अधिनियम, २०२३ चा उल्लेख करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध केवळ आरोपांच्या आधारे कारवाई न करता संबंधित संस्थेची बाजू ऐकून, उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच समाजात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, याची दक्षता घेत प्रशासनाने पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी विनंती जीझस गॉस्पेल सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी योहान कानेपागोळू, सागर तांबोळू, रविराज चंद्रकर, राजरत्न जंगम, संजीव मोरे, योहान सातालोळू, नागेश कुडक्याळ, महेश हलंगे, प्रकाश जंगम, देविदास जंगम, सुरेश भंडारे, आकाश जंगम, विजय जंगम आणि योहान तिपन्ना सातालोळू यांच्यासह जीझस गॉस्पेल सोसायटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
—-
Post Views: 22