पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करण्यास पंढरपूर येथील प्रथम वर्ग न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने त्या आदेशाविरोधात जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले आहे. या अपीलावर ७ जुलै रोजी सुनावणी होणार असून, त्यानंतर मूर्तीवरील संवर्धन प्रक्रियेबाबत पुढील निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरात येतात. पदस्पर्श दर्शन आणि नियमित अभिषेकामुळे मूर्तीची झीज होत असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार मूर्तीच्या संवर्धनासाठी रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता.
या प्रक्रियेपूर्वी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. मंदिर समितीचे सहअध्यक्ष, सदस्य तसेच विविध महाराज मंडळी यांनी मूर्तीची पाहणी केली होती. त्यानुसार आषाढी यात्रेपूर्वी २२ ते २४ जून या कालावधीत रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र काही वारकरी संघटनांनी येथील प्रथम वर्ग न्यायालयात याचिका दाखल करून रासायनिक लेपना ऐवजी आयुर्वेदिक पद्धतीने संवर्धन करण्याची मागणी केली. यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने रासायनिक लेपन प्रक्रियेस स्थगिती दिली होती.
त्यानंतर मंदिर समितीने जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले असून, त्यावर पुढील सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय कोणता निर्णय देणार आणि त्यानंतर रासायनिक लेपन प्रक्रियेला परवानगी मिळणार का, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. आषाढी यात्रेपूर्वीच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन मूर्तीचे संवर्धन होईल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
Post Views: 14