पुणे : आर्थिक अडचणीत सापडलेल्या बाराते कुटुंबाला मोठा दिलासा देत आरोग्यदूत म्हणून परिचित असलेल्या शिखर पहारिया यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील उपचाराचे संपूर्ण बिल भरून माणुसकीचा आदर्श घालून दिला. त्यांच्या या मदतीमुळे रुग्णाच्या उपचारात कोणताही अडथळा आला नाही.
आकाश वशिष्ठ बाराते यांचे वडील वशिष्ठ शिवाजी बाराते यांच्यावर दोन-तीन महिन्यांपूर्वी हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृती सुधारत असतानाच त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत उच्च रक्तातील साखरेमुळे हृदयाभोवती पाणी साचल्याचे तसेच त्याचा परिणाम यकृतावर झाल्याचे निदान झाले. त्यामुळे तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
दरम्यान, उपचाराचा खर्च झपाट्याने वाढत असल्याने आधीच शस्त्रक्रियेचा मोठा खर्च केलेले बाराते कुटुंब आर्थिक संकटात सापडले. ही बाब श्रीतेश कोठवाले यांनी शिखर पहारिया यांच्या निदर्शनास आणून देत मदतीची विनंती केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पहारिया यांनी कोणताही विलंब न करता रुग्णालयाचे संपूर्ण बिल भरले.
या मदतीबद्दल श्रीतेश कोठवाले आणि आकाश वशिष्ठ बाराते यांनी शिखर पहारिया यांचे आभार मानले. “संकटाच्या काळात केवळ सहानुभूती नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून मदत करणारे शिखर पहारिया आमच्यासाठी देवदूत ठरले,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
गरजू रुग्णांना आर्थिक मदत, उपचारासाठी सहकार्य आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी शिखर पहारिया सातत्याने कार्यरत आहेत. बाराते कुटुंबाला दिलेल्या मदतीमुळे सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
Post Views: 14