सोलापूर : “परिश्रम, शिस्त आणि चिकाटी यांच्या बळावरच यशाची शिखरे सर करता येतात,” हा प्रेरणादायी संदेश देत नॅब संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरवपूर्ण सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅब संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती अनुगीता पवार होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस नाईक व प्रशालेचे माजी विद्यार्थी अनिल गावसाने उपस्थित होते. यावेळी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या तसेच नॅब संस्थेच्या सहसचिव सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कै. शाम गोपाळ श्रीगोंदेकर व कै.राजाराम बेंजरपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करताना प्रांगणात आनंद, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.
प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “शिक्षण हीच जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी आपले ध्येय निश्चितच गाठू शकतो. आपल्या यशाने संस्थेचे आणि पालकांचे नाव उज्ज्वल करा.”
प्रमुख पाहुणे अनिल गावसाने यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा देताना सांगितले की, “या संस्थेने दिलेले संस्कार, शिस्त आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन यामुळेच मला जीवनात यश मिळाले. प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वास, जिद्द आणि परिश्रम यांच्या बळावर आपले ध्येय गाठावे,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
अध्यक्षीय समारोपात श्रीमती अनुगीता पवार यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत नॅब संस्थेची गौरवशाली शैक्षणिक परंपरा जपण्याचे आवाहन केले. यलगुलवार प्रशालेचे माजी विद्यार्थी राजेश काटकर यांनी पुणे बोर्डात सतरावा क्रमांक मिळवून संस्थेचा नावलौकिक वाढविल्याची आठवण करून देत, “या उज्ज्वल परंपरेचा अभिमान बाळगा आणि आपल्या गुणवत्तेने ती अधिक समृद्ध करा,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.जोतिबा काटे यांनी केले. सूत्रसंचालन कासिम मुजावर यांनी प्रभावीपणे केले, तर आरती बेंजरपे यांनी आभार प्रदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान, प्रेरणादायी विचारांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या समृद्ध शैक्षणिक परंपरेचा गौरव यामुळे हा सत्कार सोहळा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.
Post Views: 8