सोलापूर : शांती एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, सोलापूरच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत तसेच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया), सोलापूर लोकल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने “इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी” या विषयावरील दोन दिवसीय शिक्षक विकास कार्यक्रम (Faculty Development Program) यशस्वीरित्या संपन्न झाला.
देशभरातील पॉलिटेक्निक व अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्राध्यापकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी भारतभरातून सुमारे २२० शिक्षकांनी नोंदणी केली. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगातील नव्या संधी, संशोधनातील प्रगती आणि शाश्वत गतिशीलतेविषयी सखोल माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया), सोलापूर लोकल सेंटरचे चेअरमन डॉ. एस. बी. जोशी यांनी सहभागी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. त्यांनी तंत्रज्ञानातील सातत्याने होणारे बदल आत्मसात करण्यासाठी अशा शिक्षक विकास कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
पहिल्या दिवशी सेंटर ऑफ एक्सलन्स इन इलेक्ट्रिक व्हेईकलचे समन्वयक डॉ. प्रवीण जी. ढवळे यांनी “Fundamentals of Electric Vehicle” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांची मूलभूत रचना, कार्यपद्धती, विविध प्रकारची इलेक्ट्रिक वाहने तसेच या क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर प्रा. पांडुरंग मोरे यांनी “Battery Technology, Thermal Management & Energy Storage Systems” या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी लिथियम-आयन बॅटरी तंत्रज्ञान, बॅटरी व्यवस्थापन प्रणाली, थर्मल मॅनेजमेंट आणि ऊर्जा साठवण प्रणालींचे महत्त्व स्पष्ट केले.
दुसऱ्या दिवशी डॉ. एस. व्ही. खंडाळ यांनी “Electric Vehicle Ecosystem” या विषयावर मार्गदर्शन करताना इलेक्ट्रिक वाहन उद्योगाशी संबंधित विविध घटक, पुरवठा साखळी, धोरणात्मक बाबी आणि भविष्यातील संधी यांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या समारोप सत्रात गो ईव्ही चार्जिंग इन्फ्रा, पुणे येथील व्यवस्थापक श्री. विजय स्वामी यांनी “EV Charging Technology & Business Model” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, व्यवसाय संधी, चार्जिंग स्टेशन उभारणी आणि या क्षेत्रातील उद्योजकीय शक्यता यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष श्री शिवानंद सिद्धेश्वर पाटील तसेच संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले व उपप्राचार्य श्री एस. के. मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक श्री. जे. पी. पिंजार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
समारोप प्रसंगी यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख श्री. आर. एस. मोटगी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सहभागी शिक्षकांनी कार्यक्रमातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योगाभिमुख माहिती आणि विषयांची उपयुक्तता याबद्दल समाधान व्यक्त केले.

















