सोलापूर : शहरातील उमा नगरी परिसरातील मूळ ५० फुटांचा नाला अवघ्या ५ फुटांवर आणून त्यावरील जागेवर अतिक्रमण करण्यात आले असून, या प्रकरणात महापालिकेतील काही अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप उद्योजक व कामगार नेते कुमार करजगी यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
उमा नगरी ही त्यांच्या बहिणीच्या नावाने विकसित झालेली वसाहत आहे. या परिसरातील मूळ ५० फुटांचा नाला कागदोपत्री आणि प्रत्यक्षात ५ फुटांचा दाखवून उर्वरित जागेवर अतिक्रमण करण्यात आले. या प्रकारामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविला गेला असून भविष्यात मुसळधार पाऊस झाल्यास उमा नगरीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
शहरात सध्या नाले, उड्डाणपूल आणि रस्त्यांची अर्धवट कामे चर्चेचा विषय असताना उमा नगरीतील हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. “मागील वर्षाप्रमाणे यंदाही अतिवृष्टी झाली आणि नागरिकांच्या घरात पाणी घुसून नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणात संबंधित अधिकारी, अतिक्रमणाला संरक्षण देणारे लोकप्रतिनिधी आणि जबाबदार व्यक्तींची चौकशी करून सत्य बाहेर आणावे, तसेच भविष्यात नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने नाल्याचे मूळ स्वरूप पुनर्स्थापित करावे, अशी मागणी करजगी यांनी केली.
Post Views: 13