सोलापूर – जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा २०२६ मध्ये ‘एस शटलर बॅडमिंटन अकादमी’च्या खेळाडूंनी विविध वयोगटांत उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद आणि उपविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
९ वर्षांखालील मुलांच्या गटात केतन हेबाळे याने साद मोहम्मदचा २१-१५, १७-२१, २१-१८ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात ईश्वरी येलावे हिला वृधा जिंदेविरुद्ध २१-१०, २१-१२ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागल्याने तिने उपविजेतेपदावर समाधान मानले.

पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात अर्शद शेख आणि ऋषिकेश जोगळेकर या जोडीने पारस दोशी आणि अनिरुद्ध लोळगे या जोडीचा २१-१५, १७-२१, २१-१५ असा पराभव करत विजेतेपद मिळवले, तर पारस दोशी आणि अनिरुद्ध लोळगे हे उपविजेते ठरले. महिला एकेरीत अपूर्वा गांधी हिने उपविजेतेपद पटकावले; तिला अंतिम सामन्यात वेदश्रीकडून २१-१५, २१-१७ असा पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीत श्रेया मिस्किम आणि तनिष्का पाटील या जोडीला वेदश्री आणि नेहल शाह या जोडीकडून २१-१८, २६-२४ अशा चुरशीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्याने या जोडीने उपविजेतेपद मिळवले. आपटे ग्रुपच्या वतीने सर्व खेळाडूंना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या यशस्वी खेळाडूंचे बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष जीतू राठी, अकादमीचे संस्थापक गफूर अयुब शेख, मुख्य प्रशिक्षक अर्शद गफूर शेख, तसेच सहाय्यक प्रशिक्षक श्रीराम कुलकर्णी, सोहेल शेख, आसिफ शेख आणि अरबाज शेख यांनी अभिनंदन केले.

















