सांगोला – कृष्णा, कोयना, भीमा, पंचगंगा आणि नीरा नदीच्या पात्रातून पुराच्या रूपाने वाहून जाणारे अतिरिक्त पाणी तत्काळ टेंभू उपसा सिंचन योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना तसेच नीरा उजवा कालव्यातून पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सांगोला तालुक्याला सोडावे अशी मागणी माजी आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सांगोला तालुक्यात पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने हजारो हेक्टरवर होणाऱ्या खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांचे विहिरी, तलाव आणि कुपनलिका तसेच अन्य जलस्रोतांनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचीही समस्या गंभीर होऊ लागली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात तालुक्यातील काही गावांना टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्याला दिलासा देण्यासाठी तात्काळ टेंभू योजना, म्हैसाळ योजना आणि नीरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्याला पाणी सोडावे अशी मागणी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
सध्या कृष्णा, कोयना, निरा, पंचगंगा या नद्यांच्या परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नदीच्या काठावरील लोकांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना उलटला तरीही, पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सांगोला तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पुराचे अतिरिक्त पाणी टेंभू योजना, म्हैसाळ योजना व नीर उजवा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडल्यास पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त दोन्ही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबत मी
ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
-माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील
Post Views: 7