टेंभुर्णी – भीमा खोऱ्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकात घट झाली आहे. त्यामुळे भीमा नदीवरील बहुतांश धरणांमधून सुरू असलेले विसर्ग बंद करण्यात आले असून दौंड येथून उजनी धरणाकडे सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही सातत्याने घट होत आहे. प्रत्येक तासाला विसर्ग कमी होत असल्याने नदीपात्रातील पाण्याचा प्रवाहही मंदावला आहे.
गुरुवारी (9 जुलै) सायंकाळी 7 वाजेपर्यंत दौंड येथून उजनी धरणात 53 हजार 53,717 क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू होता. पावसाची उघडीप कायम राहिल्यास या विसर्गात आणखी घट होण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उजनी धरणातील पाणीसाठ्यात मात्र समाधानकारखी वाढ सुरू असून धरणाची पातळी हळूहळू वाढत आहे. 9 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उजनी धरणातील एकूण पाणीसाठा 84.14 टीएमसी इतका झाला असून उपयुक्त पाणीसाठा 20.48 टीएमसी नोंदविण्यात आला आहे. धरण भरावाची टक्केवारी 38.23% टक्क्यांवर पोहोचली आहे.
भीमा खोऱ्यात पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्यास उजनी धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊन धरणाची वाटचाल पन्नास टक्क्यांच्या दिशेने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मात्र पावसाची उघडीप आणि घटलेला विसर्ग यामुळे जलसाठ्यात वाढीचा वेग काहीसा मंदावला असला, तरी आगामी पावसावरच उजनीच्या पुढील भरावाची दिशा अवलंबून राहणार आहे. मात्र उजनी धरणावर अवलंबून असलेले शेतकरी उजनी धरण 50 टक्के कडे वाटचाल करू लागल्याने अनेक शेतकरी ऊस लागवड करण्यासाठी धावपळ करू लागले आहेत
Post Views: 13