बार्शी – शहरातील देशमुख प्लॉट–व्हनकळस प्लॉट परिसरातील धोकादायक ११ केव्ही उच्चदाब वीज वाहिनीमुळे पुन्हा एकदा गंभीर अपघात घडला असून, महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप परिसरातील रहिवाशांनी केला आहे. उघड्या उच्चदाब वीज वाहिनीचा जबरदस्त धक्का बसल्याने दत्तात्रय गडगंजे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जगदाळे मामा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
माहितीनुसार, माजी सैनिक भारत गव्हाणे यांच्या घरावर टीव्हीचा अँटेना बसविण्याचे काम सुरु असताना दत्तात्रय गडगंजे यांचा संपर्क घरावरुन गेलेल्या उघड्या ११ केव्ही वीज वाहिनीशी आला. विजेचा तीव्र धक्का बसल्याने ते बेशुद्ध झाले आणि त्यांचा गळा, मान व मांडी गंभीर भाजल्या गेल्या. मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या दुर्घटनेत त्यांचा जीव थोडक्यात बचावला.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उपळाई रोड (चैतन्य दुकान) ते अलीपूर रोड (मोहिते पिठाची गिरणी) दरम्यान शासकीय निधीतून ११ केव्ही अंडरग्राउंड केबलचे काम अनेक महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप ती कार्यान्वित करण्यात आलेली नसल्याने जुनी ओव्हरहेड लाईन कायम ठेवण्यात आली आहे. परिणामी, वारंवार जीवघेणे अपघात घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या धोकादायक वीज वाहिनीचे खांब खासगी मालकीच्या जागेत असून अनेक घरांवरुन उच्चदाब वाहिनी गेल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भविष्यात आणखी मोठी जीवितहानी होण्यापूर्वी अंडरग्राउंड केबल तात्काळ सुरु करुन ओव्हरहेड लाईन हटवावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Post Views: 27